रुग्णांच्या मृत्यूनंतर कोरोना मरतो? तज्ज्ञांनी दिले धक्कादायक उत्तर

कोरोना व्हायरस जगातील 180 देशात पसरला आहे. जगभरात जवळपास 10 लाख लोकांना याची लागण झाली असून 44 हजार पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतरही कोरोना व्हायरस हवेत फिरत राहतो, असा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे. अर्थात कोरोनाबाधित रुग्ण एखाद्या खोलीत असेल, तर त्या जागेत काही काळ कोरोनाविषाणू हवेत राहतो.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाचा अभ्यास केला होता. नेब्रास्का विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की रूग्ण एका ठिकाणाहून गेल्यानंतर कोरोना विषाणू अनेक तास वातावरणात राहू शकतो. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणू काही प्रमाणात हवेत राहतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्ण राहत असल्यास, त्याला घरी सोडल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर सभोवतालच्या परिसरात मात्र कोरोना जीवंत असतो. यापूर्वीही काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले होते की कोरोना विषाणू केवळ रूग्णाद्वारेच पसरत नाही तर बर्‍याच ठिकाणांच्या पृष्ठभागावर देखील असू शकतो.

हिंदुस्थानातील रुग्णांचा आकडा वाढला
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 328 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत 29 राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या 1965 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 50 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: