कोरोना व्हायरस: पाच एप्रिल रोजी मला फक्त नऊ मिनिटं द्या -नरेंद्र मोदी

“देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते अभूतपूर्वी आहे. प्रशासन आणि जनतेनं त्याला उत्तमरित्या सांभाळण्याचं काम केलंय. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे.

या लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलंय. देश एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील जनतेकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं लढू.

अजून असे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणी एकटं नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला करोना संकटाला हरवायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला वर घेऊन जायचंय. ५ एप्रिल रात्री तुमच्या सर्वांचे नऊ मिनिट हवी आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद करून सर्व घरात दिवा उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल.

त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा आपण एकटे नाही आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी कोणीही एकत्र व्हायचं नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषा तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: