रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा कोंडण्यपुरहून पंढरपूरकडे मार्गस्थ

तिवसा : जयहरी – रुक्मिणी आईसाहेबांचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून रुक्मिणी मातेची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. या पालखी सोहळ्यासोबत शेकडो वारकरी हरीनामाचा गजर करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या पालखीला तब्बल ४२५ वर्षांची परंपरा आहे.

कौंडण्यपूरहून पंढरपूरसाठी निघालेल्या पायदळ पालखीमध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग आहे. यात पुरुष-महिलांसह युवा वर्गाचाही सहभाग आहे. पालखी पंढरपूरला दाखल होईपर्यंत या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोहोचते. मजल दरमजल करीत वारकरी महिन्यांत पंढरपूर गाठतात. या वारीदरम्यान ४२ गावांत मुक्काम होतो. याशिवाय रस्त्याने लागणाऱ्या प्रत्येक गावात पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणीच पालखीचा मुक्काम राहतो. त्यातील काही वारकऱ्यांचे वंशज पालखीचे आदरातिथ्य करतात, अशी माहिती विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी दिली.

तीरथ महाराज बाराहाते, अशोक महाराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात ही पालखी कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

धिरज करळे: