राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवाराचा आज होणार भाजपात प्रवेश.!राष्ट्रवादी ला बीड मध्ये धक्का

मुंबई | विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी तर आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करुन टाकली आहे. मात्र आता त्यांच्या यादीमधील उमेदवार नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून आज त्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.


त्यामुळे केजच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचं तिकीट कट होणार हे निश्चित आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचा मार्ग धरला हा राष्ट्रवादीसाठी अजून एक धक्का आहे.

नमिता मुंदडा यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. या ‘फेसबुक पोस्ट’ नंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. कारण नमिता मुंदडांच्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हही नव्हते. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटोही यामध्ये नव्हता. यानंतरच त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची घोषणा केली होती. यामधील नमिता मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सुनबाई आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधी ही पटले नाही.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीच खिळखिळा झाला आहे. यामध्ये उमेवारांची यादी पक्षाने जाहीर केली आणि उमेदवारांच्या अशा फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या. यानंतर आज त्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

~~~~~~~~
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: