रायगडावरील 6 जूनच्या सोहळ्याला जगभरातील राजदूतांची उपस्थिती: खा.संभाजीराजे | वाचा सविस्तर

कोल्हापूर: रयतेच्या स्वराज्याचा सर्वोच्च क्षण आणि देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन असे महत्त्व असणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्‍ववंदनीय म्हणजेच ग्लोबल होणार आहे. 6 जून रोजी रायगडावर साजर्‍या होणार्‍या सोहळ्यास जगभरातील विविध देशांचे राजदूत उपस्थित राहणार असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. शिवराज्याभिषेक हा सोहळा केवळ सण म्हणून साजरा न करता एक विचार देणारे माध्यम ठरावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने 5 व 6 जून या कालावधीत रायगडावर होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी सोमवारी जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात व्यापक बैठक झाली. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी सर्वांचे स्वागत करून आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा मांडला. स्थानिक जिल्हा प्रशासनाने सोहळा सुरळीत साजरा व्हावा, यासाठी सर्वतोपरी सहकार्याची तयारी केल्याचे सांगितले. 

पाणी, आरोग्य आणि नियंत्रण कक्ष…

गडावर लाखोच्या संख्येने येणार्‍या शिवभक्‍तांसाठी मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 500 लिटर क्षमतेचे 20 वॉटर टँक, गड चढण्याच्या मार्गावर प्रत्येक 200 मीटरवर पाणी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रतीक दिंडे यांनी दिली. आरोग्य सेवेसाठी कोल्हापुरातील 30 डॉक्टर्सचे पथक औषधांचा साठ्यासह सज्ज असणार असल्याची माहिती आशुतोष बेडेकर यांनी दिली. विविध 41 समित्यांवर नियंत्रणासाठी होळीच्या माळावर 24 तास नियंत्रण कक्ष सज्ज असणार असल्याची माहिती सत्यजित आवटे यांनी दिली.

सोहळ्यासाठी उत्स्फूर्त मदत…

लोकोत्सव म्हणून साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी समाजातून उत्स्फूर्त मदत केली जात आहे. नगरसेवक महेश सावंत यांच्याकडून 25 हजार आणि सहकारी मित्रांकडून 75 हजार, अ‍ॅड. राजेंद्र कोंढरे यांनी 51 हजार, केमिस्ट असो. ने 20 हजार, गणी आजरेकर यांच्याकडून अन्‍नछत्रासाठी भाजीपाला, श्री. टकले यांच्याकडून 10 हजार, डॉ. पंजाबराव देशमुख संस्था 5 हजार, अनिल घाटगे व इतर मान्यवरांकडून वस्तू व रोख स्वरुपात मदत जाहीर करण्यात आली. 

बैठकीस विनायक फाळके, संजय पोवार, उदय घोरपडे, सागर पाटील, विजय साळोखे-सरदार, संग्राम यादव, समाधान पाटील, संभाजी आणकर, प्रदीप थोरवत, भरत कांबळे, प्रमोद व्हरांबळे, संतोष हासूरकर, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोजखान उस्ताद, पै. बाबा महाडिक, चंद्रकांत पाटील, अनिल चौगुले, शिवराज्य विचार मंचचे सचिन घोरपडे, जीवनज्योती आपत्कालीन संस्थेचे पदाधिकारी, विजय ससे यांच्यासह संपूर्ण जिल्हाभरातील शिवभक्‍त-इतिहासप्रेमी संस्था-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रायगड वर्ल्ड हेरिटेज हिल स्टेशन करणार…

शिवछत्रपतींच्या जलनीतीची साक्ष सह्याद्रीतील गडकोटांवर मिळते. एकट्या रायगडावर 84 पाण्याची टाकी, तलाव आहेत. या सर्वांचे जतन केले जाणार. गंगासागर तलावाप्रमाणेच हत्ती तलाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पूर्ववत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. चित्त दरावाजा ते महादरवाजा या मार्गावरील पायर्‍यांचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने काळा दगड, चुना आदी गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. रायगड संवर्धन समितीच्या वतीने रायगडावर ठिकठिकाणी उत्खनन, जतन-संवर्धनाचे काम सुरू आहे. नाना दरवाजासह अनेक वास्तूंचे संवर्धन अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून रायगड वर्ल्ड हेरिटेज हिल स्टेशन म्हणून नावारूपाला आणण्याचा मानस खा. संभाजीराजे यांनी व्यक्‍त केला. 

युद्धकला, पालखी, शाहिरी कार्यक्रम…

शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी, सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी राज्यभरातील मर्दानी आखाड्यांचे सादरीकरण आणि त्यांच्या वस्तादांचा विशेष गौरव सोहळा होणार आहे. कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी, सर्व जातीधर्मीय लोकांचा सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या पालखी सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले. शाहीर आझाद नायकवडी व शहाजी माळी यांनी दोन दिवस चालणार्‍या शाहिरी कार्यक्रमाची माहिती दिली

admin: