राज्यातील वाढते पक्ष प्रवेश पाहता, विधानसभेला महायुती होण्याची शक्यता धुसरच

पार्थ आराध्ये / सतीश मातने 
ग्लोबल न्युज नेटवर्क: भारतीय जनता पक्षाची विस्ताराची महत्वकांक्षा व त्या अनुषंगाने पडत असलेली पावले, शिवसेनेकडून ही ताकद वाढविण्यासाठी होत असलेले प्रयत्न तसेच या दोन्ही पक्षांकडून अन्य पक्षातील मंडळींना आपल्याकडे आकर्षित करण्याची लागलेली स्पर्धा पाहता विधानसभेला युतीची शक्यता नसल्याचा अंदाज राजकीय विश्‍लेषक मांडत आहेत.

 दरम्यान समाज माध्यमांवर ही आता यावरच चर्चा रंगत आहेत.मुंबई पासून ते गल्लीपर्यंतचे दोन्ही काँग्रेसमधील नेते आता भाजपा व शिवसेनेच्या वाटेवर आहेत. भाजपामधील इनकमिंग हे मोठे असून ते गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

 यातच लोकसभेला देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आलेली लाट व यानंतर केंद्र सरकारच्या अनेक निर्णयात धाडसी पावले टाकण्याची भूमिका पाहता भाजपाकडे मतदार आकर्षित होत आहे. यातच युवकांची संख्या खूप मोठी असल्याने  या पक्षाला आता महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविण्याखी खात्री आहे. यासाठी मिशन 220 चा नारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

 लोकसभेला देशभरात भाजपाला मोठ्य यशाची खात्री नव्हती म्हणून त्यांनी मित्रपक्षांकडून टीका होवून ही त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत बरोबर घेतले व लाड पुरवत जागा वाढवून दिल्या. मात्र आता बिहार असो की अन्यत्र अनेक प्रश्‍नांवर भाजपाचे व त्यांच्या सहयोगी दलांचे बिनसत असल्याचे चित्र आहे. 

बिहारमध्ये ही भाजपा आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात शिवसेना व भाजपामध्ये फार पटत नव्हते मात्र नाईलाजाने दोन्ही पक्ष एकत्र आहेत. 2014 ची विधानसभा स्वतंत्र लढून ही त्यांना परत एकत्र यावे लागले आहे. यातच मुंबई महापालिका असो की लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपावर सडकून टीका केली आहे तर भाजपा नेत्यांनी आपल्याच सहकारी पक्षाची अनेकदा खिल्ली उडविली आहे. 

2014 ला राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. 122 आमदार या पक्षाचे विजयी झाले होते. त्यांना स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी आणखी पंचवीस आमदार ही खूप आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात भाजपाचा व पंतप्रधान मोदी लाटेचा मोलाचा वाटा आहे व हे सारेच जाणून आहेत.

 भाजपाने दोन्ही काँगे्रसमधील अनेक दिग्गज पक्षात आणले आहेत. लोकसभेला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ही आपले उमेदवार विजयी केले आहेत. त्यांना आता विधानसभेला येथून जास्तीत जास्त आमदार हवे आहेत. याची तयारी सुरू आहे.

भाजपाने पक्षात दोन्ही काँगे्रसमधील अनेक आमदार व दिग्गज नेते आणले आहेत व आणखी काही रांगेत आहेत. कोणत्याही स्थितीत स्वबळावर सत्ता मिळविण्याची त्यांनी इच्छा लपून राहिलेली नाही. गतनिवडणुकीत भाजपाने 122 जागा जिंकल्या असून लोकसभेच्या आकडेवारीवरून तर त्यांना सर्वाधिक विधानसभा मतदारसंघात आघाडी असल्याने जागा वाटपाच्या वेळी खूप काथ्याकूट होणार हे निश्‍चित आहे. सध्या केंद्रात त्यांची सत्ता आहे, पक्षाची के्रझ कायम आहे.

 अनेक प्रश्‍न सोडविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश ही आले आहे. हे पाहता भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत जाणार हे निश्‍चित आहे. विरोधी दोन्ही काँगे्रसची राज्यात कमी झालेली ताकद पाहता स्वबळावर लढून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे ते प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे.

शिवसेनेने ही आपला पक्ष वाढविला आहे. अनेक ठिकाणी युतीतील हे दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हानं देताना दिसत आहेत. जागा वाटपाबाबत परस्पर विरोधी विधान मतदारसंघ पातळीवर आतापासूनच होत आहेत.

 यामुळे यंदा ही एकमेकांशी लढून पाहू आणि नंतर गळ्यात गळे घालू … हा गतविधानसभेचा तसेच मुंबई महापालिकेचा फॉर्म्युला पुन्हा उपयोगात आणला जाईल. याचीच दाट शक्यता राजकीय विश्‍लेषकांना वाटते. दोघे ही वेगवेगळे लढतात तेंव्हा परंपरागत विरोधकांच्याच जागा कमी होत गेल्याची उदारहणे आहेत.

======================= बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी  चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.
ReplyForward
ग्लोबल न्युज नेटवर्क: