मोदी म्हणाले- आमच्या राष्ट्रनिर्माणाचा पाया राष्ट्रवाद आहे, हे सावरकरांचे संस्कार आहेत

अकोला । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महाराष्ट्रातील अकोला येथे निवडणूक प्रचारसभेत भाषण केले. ते म्हणाले की, आमच्या राष्ट्रनिर्माणाचा पाया राष्ट्रवाद आहे, हे सावरकरांचे संस्कार आहेत.

ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि दशकांपासून त्यांना ‘भारतरत्न’पासून वंचित ठेवले ते आता सावरकरांना शिवीगाळ करत आहेत. यानंतर मोदी जालना आणि पनवेलमध्ये जाहीर सभा घेतील. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहेत. 19 ऑक्टोबरला संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 21 ऑक्टोबरला मतदानानंतर 24 तारखेला निकाल येईल.

मोदी म्हणाले, “तुम्ही गेल्या 5 वर्षात पाहिले असेलच की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील आमचे एक लक्ष्य होते – महाराष्ट्राचा विकास. आज मी तुमच्यापुढे तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी, पूर्वीपेक्षा बळकट सरकार स्थापन करण्यासाठी, दृढ हेतू असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलो आहे. ज्यांनी आंबेडकरांचा अपमान केला आणि अनेक दशकांपासून त्यांना ‘भारतरत्न’पासून वंचित ठेवले, आज ते वीर सावरकरांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान करत आहेत.”

‘काश्मीरसाठी महाराष्ट्राच्या पुत्रांनी बलिदान दिले’
मोदी म्हणाले, आज विरोधकांच्या राजकीय हालचाली कमी झाल्या आहेत. कलम 370 ची आहुती देशाच्या चरणी दिली गेली. आजकाल शिवाजी महाराजांच्या भूमीवर अशा गोष्टी पसरवल्या जात आहेत की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमधील 370 कलम काय करतंय? माझे त्यांना एकच सांगणे आहे, काश्मीर आणि तिथले लोक भारतमातेची मुले आहेत.

महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नसेल जेथील शूरपुत्रांनी जम्मू-काश्मीरसाठी बलिदान दिले नसेल. येथून जाणारा प्रत्येक तरुण म्हणतो की, मी शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. विरोधकांना लाज वाटली पाहिजे. जनता तुमच्या वक्तव्याचा हिशेब चुकता करील.

‘महाराष्ट्रात रक्ताचा सडा शिंपणाऱ्यांशी नेतेमंडळींचे संबंध उघड’

मोदी म्हणाले की, एकेकाळी काही जणांनी महाराष्ट्राला रक्ताने रंगवले होते. ज्यांच्यामुळे रक्ताचे पाट वाहिले अशांसोबत नेत्यांचे संबंध कसे आहेत, याविषयी आज नवनवीन खुलासे केले जात आहेत. नेत्यांना ठाऊक होते की, त्यांचे कुकृत्य कधीतरी बाहेर येईल आणि देशातील जनतेला उत्तर द्यावे लागेल. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तपास यंत्रणांना बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांवरही अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले, पण आता वेळ बदलली आहे.

17 ऑक्टोबरला मोदींचे तीन मेळावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा आणि परळी येथे जाहीर सभा घेतील. ते 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत प्रचाराची अखेरची सभा घेतील. रविवारी मोदींनी जळगाव आणि भंडारा येथे मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी कलम 370 काढून तिहेरी तलाक संपवण्याबद्दल विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांना आव्हान दिले की, आपल्यात ताकद असेल तर आपल्या जाहीरनाम्यात लिहा – आम्ही 370 परत आणू. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता मोदींनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची खिल्ली उडवली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: