मुख्यमंत्र्याचे मोठे विधान:अडीच अडीच वर्षाचा शब्द दिला नव्हता


मुंबई, 29 ऑक्टोबर : मी 5 वर्षे मुख्यमंत्री पदावर राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे ‘अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नव्हता’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेची चर्चा रंगली आहे. युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणे युतीचा मार्ग निघाला नाही तर आम्ही वेगळ्या पर्यायांचा विचार करू असा इशारा आज संजय राऊत यांनी दिला.

एकीकडे 50-50 चा फॉर्म्युला ठरला असल्याचं शिवसेनेनं म्हटलं तर असं काहीही बोलणं झालं नाही अशी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. सेना-भाजपच्या या गुंत्यामुळे खरंतर सत्ता कोण स्थापन करणार? आणि कोणाचा मुख्यमंत्री असणार यावर आता नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तर दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात ठाकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– सामनामध्ये येणाऱ्या गोष्टी यांचा चर्चेसाठीचा रोल नसतो. तर चर्चा भरकटवण्यासाठी असतो

– पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला

– भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या बायकोने स्वतः सांगितले की घरगुती कारणावरून ही घटना घडली आहे

– अमित शाह उद्या येणार नाही. सेना भाजपमध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशी चर्चा सुरू आहे

– शपदविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे

इतर बातम्या – फटाक्यांची माळ लावताना स्कॉर्पिओने चिरडत लांबपर्यंत नेलं, अपघाताचा LIVE VIDEO

– कोणती खाती कोणाला द्यायची ते ठरलं नाहीये, चर्चेला बसल्यावर ठरेल

– 1995 चा फार्म्यूला आहे किंवा काय असेल असे काही ठरलेलं नाहीये

शिवसेनेसमोर पेच, भाजपशिवाय पर्याय नाही

निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्षात बसू असंही त्यांनी सांगितलं होतं. यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली असून त्यांना भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. 2014 मध्ये राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. राज्यात मध्यावधी लागू नयेत यासाठी ही भूमिका घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्यात भाजपने 105, शिवसेनेनं 56, राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनं 44 जागी विजय मिळवला. अपक्ष, बंडखोरांसहीत इतर पक्षांतील उमेदवारांनी 28 जागा जिंकल्या आहेत. आता राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी कोणताच प्रयत्न करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं शिवसेनेला भाजपसोबतच जावं लागेल. यात त्यांना पुन्हा तडजोड करावी लागू शकते. भाजपने त्यांच्या अटी मान्य न केल्यास सेनेसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: