माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल तरुणांचा उस्फुर्त सहभाग, वाचा सविस्तर-

औदुंबर भिसे

टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीने पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये दाखल झाली.

पहाटे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ऍड.विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते माऊलींची नित्यपूजा व आरती करून सकाळी ६ वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेवून सासवडकडे मार्गक्रमण केले. सकाळी ७.४५ वाजता हा सोहळा शिंदेछत्री येथे पोहोचला.

याठिकाणी आरती झाल्यानंतर सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला. माऊलींच्या सोहळ्या पाठोपाठच तुकोबारायांचा सोहळा याच मार्गाने लोणी-काळभोरकडे मार्गस्थ झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

सकाळी ९.१५ वाजता हा सोहळा हडपसर येथे पोहोचला. हडपसर येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अल्पशा विश्रांतीनंतर सकाळी १०.१५ वाजता माऊलींचा सोहळा सासवडकडे तर सकाळी १० वाजता तुकोबांचा सोहळा लोणी-काळभोरकडे मार्गस्थ झाला.

सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व पावसाची भुरभूर सुरू असताना देखील पुणे ते दिवेघाट या वाटचालीत मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. यामध्ये तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग   दिसून आला. ‘सैराट’ चित्रपटाच्या ‘झिंग झिंग झिगाट’ या गीतावर ठेका धरणारी तरुणाई ज्ञानोबा तुकोबांच्या भजनामध्ये तल्लीन होउन गेली होती. 

सासवडमध्ये उत्साही स्वागत

झेंडेवाडी येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता हा सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. सासवड नगरपालिकेच्या हद्दीत सोहळा पोहोचल्यानंतर नगरवासियांनी सोहळ्याचे स्वागत केले. रात्री  ८ वाजता हा सोहळा सासवड येथे पोहोचला. आरतीनंतर २ दिवसांच्या मुक्कामासाठी कर्‍हा काठावर हा सोहळा विसावला.
 

सोपानकाकांचे रविवारी प्रस्थान
यावर्षी तिथीचा क्षय झाल्याने दोन दशम्या आल्या आहे. त्यामुळे माऊलींच्या सोहळ्यानंतर दुसर्‍या दिवशी श्री संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. यावर्षी मात्र श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा रविवार दि.३० रोजी दुपारी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: