मनसेला मोठा धक्का, नांदगावकरांनी हातात बांधले शिवबंधन

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचे लोण आता मनसेपर्यंत आले आहे.

एका सच्च्या मनसैनिकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा मनसेसाठी जबर धक्का आहे. धडाकेबाज आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हाती शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेप्रमुख विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या तयारीत आहेत. मात्र एक सच्चा मनसैनिक पक्षातून जाणे हा त्यांच्यासाठी धक्का आहे.

मनसेस्टाइल आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे नेहमीच चर्चेत राहायचे. त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्यायही मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र आता त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या पक्ष सोडण्यामागचे कारणही तसेच आहे. नितीन यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. अखेर त्यांनी रात्री मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: