भाजपला मोठा धक्का, लातूर महानगरपालिकेत सत्ता भाजपची महापौर काँग्रेसचा

लातूर । महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना महापौर काँग्रेसचा झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शैलेश गोजमगुंडे यांचा 35 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर विजय मिळविला. भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. लातूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून महानगरपालिकेत अडीच वर्षातच सत्तातंर झाले आहे.

उपमहापौर पदाची निवडणूक भाजपच्या भाग्यश्री कौळखरे व भाजपचेच बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांच्यात झाली. यात भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर 32 विरुद्ध 35 मतांनी विजय मिळवला. लातूर मनपात भाजप 35, काँग्रेस 33 व अन्य 1 असे पक्षीय बलाबल आहे.

आजच्या महापौर पदाच्या निवडी दरम्यान काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी 68 सदस्य उपस्थित होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात 68 पैकी 35 मते काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली. तर उपमहापौर निवडीवेळी 68 पैकी भाजपच्या नगरसेविका शकुंतला गाडेकर अनुपस्थित राहिल्या. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.

दरम्यान भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला होता. व्हीप डावलून काँगेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. निवडीनंतर काँगेस कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: