भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत, खडसेंचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. त्यामुळे ते नेत्यांना धुवून घेतात. आरोप असलेल्या नेत्यांना नंतर क्लिन चिटही दिली जाईल, असे ते म्हणाले.

त्याचबरोबर भाजपत येणारे साधू-संत नाहीत. काही ना काही मिळेल या हेतूसाठीच येत आहेत. काहींना पद मिळेल असे वाटते तर काहीच नाही तर सत्तेची ऊब तर मिळेल या हेतूने पक्षात येत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. सत्ता कोणाकडे असते तिकडे नेते जात असतातच. अशांचे विचारांशी देणेघेणे नसते, असेही त्यांनी म्हटले.

‘एबीपी माझा’शी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही पद मिळेल, मान-सन्मान मिळेल या स्वार्थासाठी हे नेते येत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. आमच्याकडेही अनेक आरोप असलेले अनेक नेते दाखल झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. ते नेत्यांना धुवून घेतात. नंतर त्यांनी क्लिन चिटही दिली जाईल, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. आमचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, जनता चांगल्या लोकांना निश्चितच निवडून देतील. पुन्हा त्यात चांगल्या लोकांची व्याख्येचाही प्रश्न आला, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी नारायण राणेंविषयीही भाष्य केले. राणे भाजपत येणार असल्याचे मी अनेक वर्षे झाली ऐकतोय. शिवसेनेच्या दबावाखाली राणेंचा प्रवेश थांबवण्याची गरज नाही. प्रत्येक पक्षाला कोणाला पक्षात घ्यायचंय, याचा अधिकार आहे. आम्ही छगन भुजबळ यांना पक्षात घेऊ नका असे शिवसेनेला सांगणार नाही, असे त्यांनी म्हटले.

शरद पवार यांच्याविषयीही त्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी सोडून लोक जात आहेत. हे काही नवीन नाही. राजकारणाची पुनरावृत्ती आहे. आधी हे काँग्रेसमध्ये होत होते. तेच आता राष्ट्रवादीत होत आहे. पवार यांनीही यापूर्वी असे केले आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: