भक्तीच्या सुकाळाने केली,नैसर्गिक दुष्काळावर मात, वाचा सविस्तर-

सर्वच पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी

पार्थ आराध्ये

पुणे – प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या असून मागील वर्षीचा भीषण दुष्काळ व यंदा मान्सूनने दिलेली ओढ यामुळे यातील गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र तशी स्थिती या सोहळ्यांमध्ये दिसत नाही. मोठ्या संख्येने वारकरी यात सहभागी झाले आहेत.

संत ज्ञानेश्‍वर माउलींची पालखी मंगळवारी आळंदीहून निघाली आहे, या सोहळ्यात मोठी गर्दी असून याचे प्रत्यंतर आळंदीच आले होते. याच बरोबर देहूतून प्रस्थान ठेवलेल्या जगत्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोबत ही भविकांची मोठी संख्या आहे. या दोन्ही पालख्यातील गर्दी पाहता यास मोठा पोलीस बंदोबस्त पुणे जिल्हा पोलिसांकडून पुरविला गेला आहे.

दरम्यान हे सोहळे सुरू होण्यापूर्वी यंदाच्या वारीवर दुष्काळाचा परिणाम होईल अशी चर्चा होती. याच बरोबर या पावसाळ्यात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. अशा स्थितीत ही वारकर्‍यांनी विठ्ठलासह संतांवर भरोसा ठेवून पायी वारीत सहभाग मोठ्या संख्येने घेतला आहे.

देहू व आळंदी ते पुणे अशी पायी वारी करणारे अनेकजण असतात. रोजच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून राज्याच्या कानाकोपर्‍यातून एक- दोन दिवस संतांच्या पालख्यात चालणार्‍यांची संख्या ही मोठी आहे. बुधवारी दोन्ही संतांच्या पालख्या दोन दिवसांसाठी पुणे मुक्कामी असणार आहेत.

यानंतर त्या आपआपल्या मार्गे पंढरीकडे प्रस्थान ठेवतील. या संतांच्या पालख्यांमध्ये सहभागी होणार्‍या दिंड्यातील वारकर्‍यांबरोबरच सोहळ्यासमवेत चालणार्‍या पंढरीसमवेत चालणार्‍या भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सहभागी वाहनांची संख्या ही मोठी आहे.

उशिरा मान्सून राज्यात दाखल झाला असून सध्या या पावसाने पुणे भागात जोर धरला आहे. जर ही स्थिती अशीच राहिली तर भाविकांची तारांबळ उडणार आहे. राज्य सरकारच्या निर्मल वारी अभियाना अंतर्गत पाच लाख रेनकोटचे वाटप भाविकांना केले जात आहे.

माउली व जगत्गुरूंच्या पालखी सोहळ्यांबरोबरच राज्यातून अनेक पालख्या ही पंढरीच्या वाटेवर आहेत. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून निघाली आहे तर त्र्यंबकेश्‍वरहून निघालेला निवृत्तीनाथाचा पालखी सोहळा आज बुधवारी बेलापूर मध्ये मुक्कामी आला आहे. संत मुक्ताई व संत गजानन महाराजांचे पालखी सोहळे मागील वीस दिवसांपासून मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने येत आहेत.

कौंडण्यपूर येथून माता रूक्मिणीची दिंडी ही निघाली आहे. संत सोपानदेव यांचा पालखी सोहळा 30 रोजी सासवड येथून पंढरीसाठी प्रस्थान ठेवणार आहे.

मोठा बंदोबस्त
संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याला मोठा बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. भाविकांची गर्दी पाहता चोर्‍या करणार्‍या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रत्येक पालखी सोहळ्यात 150 हून अधिक साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याच बरोबर बॉम्बशोधक, निकामी करणारी पथकं ही पालखी सोहळ्या समवेत आहेत. पुण्यात दोन पालख्यांचा मुक्काम असल्याने येथे दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने याबाबत ही नियोजन करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: