बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं – अमोल कोल्हेंचं आदित्य संवाद यात्रेवर टीकास्त्र

पुणे । शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरूवात आजपासून झाली आहे. यावेळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गडावरील देवीची पुजा व आरती करून ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज शिवनेरी गडावरील माती भाळी लावून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली. यानंतर झालेल्या जुन्नर येथील सभेत अमोल कोल्हे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेची खिल्ली उडवत टीका केली. काही लोक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतात जात आहेत. मात्र त्यांची अवस्था, ‘बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं’ अशी झाली असल्याचे सांगत असताना आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता कोल्हे यांनी संवाद यात्रेवर टीका केली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेची घसरण झाकण्यासाठी कलम 370 हटवले

मोदी सरकारने कलम 370 हटवले, या निर्णयाचे स्वागत. काश्मीरच्या विकासाचे कौतुक आहे. मात्र हा निर्णय घेत असताना ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? याचाही डोळसपणे विचार करायला हवा, असे कोल्हे यांनी सांगितले. निवडणुकीनंतर सातत्याने शेअर बाजार गडगडत आहे. आयएल अँड एफएस सारख्या कंपनीने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडवले आहेत. अनेक उद्योजकांनी सरकारी बँकाचे कोट्यवधी बुडवले आहेत. अर्थव्यवस्थेचे अपयश झाकण्यासाठी जर 370 हटविले गेले असेल तर आपण हा प्रश्न वारंवार सरकारला विचारला पाहीजे, असेही कोल्हे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: