बार्शी विधानसभा मतदारसंघात शांततेत 73.34 टक्के पाऊस

बार्शी मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण
73.39 टक्के मतदान

बार्शी: विधानसभा निवडणुकीत बार्शी तालुक्यात सुरळीत व शांततेत मतदान पार पडले. विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 59 हजार 669 पुरुष मतदारांपैकी 117009 तर  1 लाख 46 हजार 240 महिला मतदारांपैकी 104437 असा एकूण 221452 (72.39 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तालुक्यात एकूण 3 लाख 6 हजार 507 मतदारांपैकी 221452 ( 72.39 टक्के) मतदान झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

रविवार रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मतदान प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार असे वाटत होते. त्यानुसार सकाळी 9 वाजेपर्यंत पाऊस सुरुच असल्याने मतदार मतदानासाठी घराच्या बाहेर पडला नसल्याचे दिसून आले. सकाळी 7 ते 9 या पहिल्या दोन तासात 3.19 टक्के मतदान झाले होते. यामध्ये कित्येक मतदार केंद्रावर 8, 10, 15 असे मतदान झाले होते.  9 ते 11 या वेळेपासून मतदान केंद्रावर गर्दी वाढून रांगा वाढू लागल्या. या रांगा मात्र 1 वाजल्याच्या पुढे जास्तच लांब लागल्याचे ग्रामीण भागात सर्रास मतदान केंद्रावर दिसून येत होते. 11 ते 1 या वेळेत 14 टक्के मतदान झाले. या 4 तासात 42 हजार 903 मतदारांनी मतदान केले.

दुपारी 1 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले. मतदानाचा आकडा 93 हजार 315 वर पोहचला. 1 ते 3 या काळात 47 टक्के मतदान झाले व एकूण आकडा 1 लाख 43 हजार 858 वर गेला. 3 ते 5 या टप्प्यात  सर्वच मतदान केंद्रावर लांबच्या लांबच रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. या टप्प्यात 98 हजार 328 पुरुष, 95 हजार 113 महिला तर इतर 4 असे एकूण 1 लाख 93 हजार 445 (63.23 टक्के) मतदारांनी मतदान केले होते. 5 नंतरच्याही शहरासह ग्रामीण भागातील अनेक मतदार केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहवयास मिळत होते. त्यामुळे शहरातील अनेक बुथवर सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान सुरुच होते. सायं. 6 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येवू दिला.

सर्व मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार हे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष देवून होते. पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्‍वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका पोलीस स्टेशन राहुल देशपांडे, वैराग पोलीस स्टेशनचे अरुण सुगांवकर, पांगरी पोलीस स्टेशनचे सचिन हुंदळेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या व जास्त मतदान संख्या असलेल्या केंद्रावर नजर ठेवून होते. यामुळे तालुक्यात कोठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळच्या दोन तासात पावसामुळे कमी झालेले मतदान यामुळे दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. त्यामुळे कित्येक मतदान केंद्रावर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरु होते.

उमेदवारांपैकी महायुतीचे दिलीप सोपल यांनी शहरातील सुभाष नगर केंद्रावर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांनी वैराग येथील कन्या प्रशाला केंद्रावर मतदान केले. याशिवाय महाहौसिंग सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी न.पा. शाळा नं. 2 मध्ये मतदान केले.
— चौकट नं. 4 —
मतदान सुरु असताना काही तांत्रिक अडचणीमुळे घारी नं. 50 व 51, बार्शी नं. 108 व 122, रस्तापूर, भोईंजे, वैराग नं. 241, बोरगांव, संगमनेर, फपाळवाडी व मळेगांव अशा 11 ठिकाणचे ईव्हीएम मशीन तात्काळ बदलून तेथे पूर्ववत मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
 — कोट —
कार्यकर्त्यांनी केलेले अफाट परिश्रम व जनतेने ताब्यात घेतलेली निवडणूक यामुळे 15 हजार मतांनी मी निवडून येईन, असा दावा अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला तर  महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांचे प्रेम, केलेले प्रयत्न  व लोकांचा माझ्यावर असलेला विश्‍वास यामुळे माझा निश्‍चित विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांनी मी नवखा असतानाही तालुक्यातील जनतेने माझ्यावर व शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून मला चांगले मतदान झाले असल्याचे सांगत माझा विजय निश्‍चित असल्याचे ते म्हणाले.

117009 पुरुष,104437 महिला,इतर 6 असे एकूण 221452 (72.39 ) टक्के मतदान बार्शी विधानसभा मतदारसंघात झाले

ग्लोबल न्युज नेटवर्क: