बार्शीत घरफोडी, 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास

गणेश भोळे

बार्शी:

येथील नाईकवडी प्लॉट येथे असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्रे असा 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.

याबाबत घराचे मालक धीरज अशोक ठोकळ यांनी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे. धीरज ठोकळ हे त्यांची आई, बहीण, भच्चे यांच्यासह  एकत्रित राहत असून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असून त्यांची आई बार्शी नगरपालिकेत नोकरीस आहे.  बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास  ठोकळ परिवार जेवण करुन घरात गरम होत असल्याने घराच्या स्लॅपवर झोपण्यासाठी गेले. जाताना घराला कुलूप लावून दारे खिडक्या बंद करुन गेले. पहाटे धीरज व्यायामासाठी उठला असता त्याला घराला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. त्याने घरात जावून पाहिले असता घरातील डबे व कपाट उघडलेले दिसले. तेथे कपडेही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावरुन त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व कागदपत्रे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याची पिळ्याची अंगठी, 10 हजार रोख रक्कम, दोन भार चांदीची जोडवी,  पाकीटामध्ये ठेवलेले एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ड्रायव्हींग लायसन्स याचा समावेश आहे. 

याबाबत पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला असून याचा अधिक तपास पोलीस नाईक गोरख भोसले हे करीत आहेत.

— चौकट —

दुष्काळी परिस्थिती असतानाही बार्शी शहरामध्ये सातत्याने चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. पूर्वी झालेल्या चोर्‍यांचा, बसस्थानकातील चोर्‍यांचा अद्याप शोध लागला नसून शहरामध्ये अवैध व्यवसाय जोमाने सुरु झाले आहेत. त्यामुळे तर शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असावी असे शंका कुशंका नागरिकांतून व्यक्त होत आहे

admin: