बार्शीकर आमच्या बाजूने उभे राहतील: दिलीप सोपल

बार्शी : आमच्या विरोधकाला थाप मारूनी थापाड्या गेला हे गाणे लागु पडते. लोकांना काय कळत नाही असे समजून विरोधक बोलतात. शहरात आमच्याकडे सत्ता असताना सर्व पाईपलाईन नव्याने करण्यासाठी 7 कोटींचा निधी आणला. पण त्या निधीची विरोधकांनी विल्हेवाट लावली अशी टीका महायुती चे उमेदवार दिलीप सोपल यांनी केली.

शहरातील पांडे चौकात शुक्रवारी सांयक़ाळी आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते माजी नगरसेवक शशिकांत गव्हाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाहौसिगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काकडे, शहरप्रमुख दिपक आंधळकर, पालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनराध्यक्ष आबा पवार, माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण, युवानेते आर्यन सोपल, बाजार समितीचे संचालक साहेबराव देशमुख, माजी नगरसेवक राजाभाऊ  काकडे, वाहिदपाशा शेख, सुशिल पाटील, माजी नगरसेवक नागजी नान्नजकर आदी उपस्थित होते.

यावेळी अक्कलकोटे प्रास्ताविकमध्ये म्हणाले सोपलांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षापुर्वी शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या, वेळेवर पाणी पुरवठा केला, चांगले रस्ते बांधले पण आज या शहरातील नागरिकांना अतिशय यातना देण्याचे काम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका सत्ताधार्‍यांनी केले आहे. पालिका कर्जबाजारी करून लुटली आहे. पालिका कर्मचार्‍यांचे पगार सुध्दा वेळेवर दिले जात नाहीत अशी परिस्थिती आहे.

यावेळी आंधळकर म्हणाले, मी पोलीस खात्यामध्ये काम करत असताना अनेक गुंडाना वठनीवर आणले आहे. त्यामुळे मला दादागिरीची भाषा चालत नाही. गरिब जनतेला जर कोणी दमदाटी करत असेल, तर ती खपवुन घेणार नाही. शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांला पाडा असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे, हे सच्चा शिवसैनिकांनी लक्षात ठेवावे. बार्शी दहशतमुक्त करणारच.

यावेळी मिरगणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करणार्‍याला धडा शिकवा. तालुक्याच्या विकास निधीचा स्वत:च्या स्वार्थासाठी  दुरूपयोग करून पालिकेतील कंत्राटदारांकडून कमिशन खाणार्‍यांना सत्तेबाहेर काढा. महिलेचा अपमान करून आपली लायकी दाखवणार्‍यांना बार्शीकर जनतेने थारा  देवु नये. तालुक्यातील प्रत्येक बेघराला यापुढे तीन खोल्या व संडास बाथरूमचे पक्के घर देणार आहे. शहरात 10 हजार आणि ग्रामीण भागात 20 हजार पक्की घरे बांधणार आहे.

दिलीप सोपल हेच तालुक्यात सक्षम, अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. सोपलांच्याच माध्यमातून तालुक्याचा विकास होणार आहे. सोपलच उपसासिंचन योजना मार्गी लावतील. एम.आय.डी.सी. कार्यान्वीत करतील. वैराग तालुका निर्मिती करणारच, त्याचप्रमाणे वैरागला ग्रामीण रूग्णालय आणणारच, नगरपंचायत करणारच, मराठवाड्याला जाणारे उजनीचे पाणी आऊटलेट काढून धरणांच्या माध्यमातून तालुक्यात पूरविणारच.

सोपल पुढे म्हणले कीआज शहरातल्या नागरिकांना दिवाळी असो वा रमजान ईद, सनासुध्दीच्या काळात सुध्दा आठ-आठ दिवस पाणी मिळाले नाही. आमच्या काळात उजनी धरण 60 टक्के मायनस असताना सुध्दा नियोजन करून एक दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा केला होता. पण विरोधकांना पालिकेत टक्केवारी खाण्याशिवाय काय सूचत नाही. भुयारी गटारी योजनेमुळे बार्शीतील नागरिकांचे हाल झाले. मोठ्या साईजचा पाईप आणि त्याच्या दुप्पट चारी अशा पध्दतीने काम करून प्रत्येक प्रभागाचे काम करून रस्ता पुर्ववत करायला पाहिजे होता. पण पालिकेतील सत्ताधार्‍यांनी लक्ष्मी दर्शनासाठी घाईने काम उरकले. लहान साईजचा पाईप आणि चौपट चारी खांदले. सगळे गाव उकरून ठेवले. एकही रस्ता चांगला ठेवला नाही. उत्खनन केलेल्या मोहें जोदडो शहरासारखी बार्शीची अवस्था करून ठेवले.

शहरात पाऊस आला की चिखल होतो आणि दररोज पाच-दहा नागरिक गाडीवरून घसरून पडत आहेत आणि पाऊस नसताना धुळीमुळे नागरिक बेजार होतात. भ्रष्टाचार करताना स्मशानभुमीतील गॅसदाहिनीसुध्दा सोडली नाही. बाजार समितीच्या सत्तेच्या माध्यमातूनही व्यापार्‍यांना त्रास सुरू आहे. हप्ते खाण्याचे काम सुरू आहे. गाळे देताना खंडणी उकळली जात आहे असा आरोप केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: