बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई: पक्षात बाहेरुन आलेल्यांना तिकीटे मिळाली. तसेच निष्ठावंतानांही तिकिटे दिली आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट वाटपास थोडा उशीर झाला. कोणीही नाराज होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. तिकीट कापलेल्यांना नवी जबाबदारी देणार असल्याने त्यांना डावलले असा अर्थ होत नाही.

काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. त्यांना समजावणार आहोत. मात्र, त्यांनी ऐकले नाही तर त्यांना युतीत कोणतेही स्थान राहणार नाही. तसेच महायुती त्यांच्याविरोधात सर्वशक्तीनीशी उतरेल. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजय होईल, असा विश्वास या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

मनापासून युती केल्यानंतर काही तडजोडी कराव्या लागतात. आता महायुतीत आम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून आणि एकदिलाने करत आहोत. राज्यातील लोकसभेपूर्वीचे वातावरण आता बदलले आहे. दोन्ही पक्षात कोणतेही मतभेद नसून आम्ही एकत्र आलो आहोत. मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण या वादात अडकण्यापेक्षा आम्ही भावा-भावाचे नाते टिकवले आहे.

महायुतीबाबतची घोषणा लोकसभेवेळीच झाली होती. जागावाटप आणि सत्तेतील वाटपाबाबत आमचे ठरले आहे. ते पुन्हापुन्हा सांगण्याची गरज नाही. युती करताना आकड्यांवर काही अवलंबून नसते. राज्याच्या हितासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्र घडवण्यासाठी तुझे माझे करण्यापेक्षा राज्याचा विचार करून आम्ही एकत्र आलो आहोत. राजकारणाची पहिली पायरी म्हणजे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ही नसून राजकाणात प्रवेश होणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीवेळीच युतीची घोषणा झाली होती. आमच्यात अनेक मतभेद होते, अजूनही काही मतभेद असतील. मात्र, हिंदुत्त्वाचा मुद्दा दोन्ही पक्षांना जोडणारा धागा आहे. युती होईल का हा प्रश्न आमच्या मनात कधीच नव्हता. युती करताना काही गोष्टीत तडजोड करावी लागते. लोकसभेत जनतेने मोदी सरकारला मताधिक्याने विजयी केले. त्या विजयात राज्यातील महायुतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जनतेच्या इच्छेनुसार महायुती होत आहे. कोणाला किती जागा, कोणत्या जागा मिळणार, यावर वाद झाला नाही. सामंजस्याने एकत्र बसून यावर मार्ग काढण्यात आला.

शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर निसर्गावर अवलंबून राहता येणार नाही. गेल्या पाच वर्षात राज्याच्या विकासाचे काम सुरू झाले आहे. ते आणखी पुढे न्यायचे आहे. जलसंधारणाचे चांगले कामही आमच्या सरकारने केले आहे. पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. त्यासाठी जनता महायुतीला प्रंड मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत ते मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: