प्रचार तोफा थंडावल्या, सोमवारी होणार मतदान, राज्यात 3 हजार 239 उमेदवार रिंगणात;आघाडी की महायुती

ग्लोबल न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीसाठी मागच्या दोन आठवड्यांपासून सर्वच पक्षांनी अवघा राज्य पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. विविध राजकीय पक्षांची प्रचाराची मुदत आज संध्याकाळी सहा वाजता संपली आहे. आता सोमवारी (२१ ऑक्टोबर रोजी) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानुसार मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यात एकूण 288 मतदारसंघांत 3,239 उमेदवार नशीब आजमावत आहेत. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. असे असेल तरी मतदानाचा टक्का वाढेल का, हाच खरा प्रश्न आहे. मतदानाचा दिवस सुटी समजून घरी घालवणाऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने व विविध संस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केले आहेत. आता प्रत्यक्ष मतदान किती होते हे पाहणे महत्त्वाचे राहील. 

आता आली तुमची बारी!

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांनी एकच प्रचाराचा धुरळा उडवला होता. तो आता खाली बसला आहे. या काळात प्रचारसभा, कॉर्नर बैठका, बाईक रॅली, पदयात्रा, सोशल मीडिया अशा जवळपास सर्वच माध्यमांतून राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; पण आता बारी मतदार राजाची आहे. सुजाण मतदारांनी आपला निर्णय घेऊन सोमवारी मतदान करायचे आहे.

राज्यभर प्रचाराचा धुरळा अन् पावसाचाही खोडा

राज्यातील लढत प्रामुख्याने भाजप-शिवसेना व मित्रपक्षांची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी अशी आहे. परंतु, या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जनतेला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ऐनवेळी आपले शंभरावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यामुळे वंचित आणि मनसेच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.

याकाळात राज्यभरात नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे झाले, कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि प्रचाराच्या भोंग्यांनी वातावरण दणाणून सोडले होते. उमेदवारांच्या प्रचाराचा जणू प्रचंड धुरळाच उडाला होता. तथापि, अनेक ठिकाणी पावसाने खोडा घातल्याने अनेक दिग्गजांना सभा रद्दही कराव्या लागल्या. एकूणच जितक्या ठिकाणी पोहोचता येईल तितक्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांनी कसोशीने केला.

अनेक बंड नाही झाले थंड

तिकीट कापल्याने नाराज निष्ठावंतांनी बंडाचा झेंडा उगारला, आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात शड्डू ठोकले. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप-शिवसेना उमेदवारांच्या बंडखोरीवरून याची प्रचित आली आहे. यापैकी काही जणांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर आपल्या तलवारी म्यानही केल्या. परंतु अनेक जण बधले नाहीत हेही तेवढेच खरं आहे. आता हे बंडखोर चकित करणारी कामगिरी करतात का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.

मोदी-शाह महाराष्ट्रात, सोनिया-प्रियंकांनी फिरवली पाठ

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जाहीर सभा घेतल्या. यात त्यांनी सातारा, पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी घेतलेल्या सभा विशेषत्वाने गाजल्या. अमित शाहांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच सभांचा धडाका लावला होता. परंतु दुसरा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राहुल गांधींव्यतिरिक्त दिल्लीतील इतर कुणीही फिरकलंसुद्धा नाही.

पक्षाच्या अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी आणि सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राकडे पाठ का फिरवली, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. राहुल गांधी यांनी प्रचारात उशिरा सहभाग घेतला असला तरी त्यांनी आपल्या सभांमधून भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले.

शिवसेनेचा आदित्योदय

ही विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे. इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती यंदा निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे आहेत. यामुळे शिवसेनेसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारसभांचा धडाका लावला. तत्पूर्वी, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात दौरे काढले होते. ठाकरे पिता-पुत्रांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या. शिवसेना – भाजप युती असली तरी कणकवलीत मात्र दोघांचेही उमेदवार आमनेसामने उभे राहिले आहेत. याला कारण ठरले राणे! नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली, तर शिवसेनेच्या सावंत यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनीही सभा घेतली. शिवसेनेने कणकवलीची जागा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे नक्की! युतीच्या जागा वाटपानंतर शिवसेनेने 124 तर भाजपने 162 जागांवर आपले उमेदवार उभे केले.  दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. आता निवडणूक निकालानंतरच युती सरकारचे भवितव्य स्पष्ट होईल. 

पवारांची वन मॅन आर्मी!

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीपासूनच राष्ट्रवादीला मोठी गळती लागली. राष्ट्रवादीतल्या अनेकांनी भाजप किंवा शिवसेनेशी घरोबा केला अन् तिकीटही मिळवलं. यादरम्यानच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर शिखर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले. यात दस्तुरखुद्द शरद पवारांचंही नाव आलं. परंतु संकटांचं संधीत रूपांतर करणारा नेता म्हणून त्यांची असलेली ओळख त्यांनी या प्रसंगातूनही दाखवून दिली. पवारांच्या आक्रमक बाण्यामुळे राष्ट्रवादीत नाही म्हणायला थोडा जोश संचारल्याचं पाहायला मिळालं. पक्षातील अनेक जण निघून गेलेले, दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघात अडकून पडलेले अशा परिस्थितीत वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवारांनी एकट्यानेच सभांचा प्रचंड धडाका लावला. या सभांमधील त्यांची अनेक भाषणं गाजली. दरम्यान, शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात घेतलेली सभा अनेकांच्या मनात घर करून गेली. वयाच्या ८० वर्षी शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेची चर्चा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात रंगली. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअप, फेसबुकला पवारांचा भरपावसात भाषण करताना फोटो डीपी करून ठेवला. मागच्या दोन आठवड्यात राज्यात त्यांनी झंझावती प्रचार दौरा केला.

मुद्दा कोणता- कलम 370 की बेरोजगारी?

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या सभांमधून शरद पवार यांच्यावरच बहुतांश वेळा निशाणा साधला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमध्येही त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचताना विरोधकांवर जोरदार टीका केली. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या अजेंड्यावर होता. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. कलम ३७० रद्द करणे आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक याचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर विरोधकांकडून खड्डे, बेरोजगारी, व्यापाऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मनसेची विरोधी पक्षाची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाहीर सभा घेत विचार करून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. त्यांनीही आपल्या सभांमधून भाजप सरकारवर जोरदार हल्ला केला. मनसेने यावेळी शंभरच्या वर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतु सर्वात जास्त चर्चा झाली ती राज ठाकरे यांच्या अनोख्या आवाहनाची. राज ठाकरे यांनी आम्हाला प्रबळ विरोधी पक्ष बनण्यासाठी निवडून द्या, असे आवाहन जनतेला केले. यासाठी त्यांनी एकप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणावर आसूड उगारला. फक्त 107 उमेदवार रिंगणात उतरवून आपण सत्ता द्या असे म्हणू शकत नाही, परंतु सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कामगिरी वठवू शकतो, असा विश्वास त्यांनी मतदारांमध्ये जागवण्याचा प्रयत्न केला.

‘वंचित’च्या कामगिरीकडे राज्याचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकाच चिन्हावर जवळपास 206 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यामुळे यंदाच्या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यभरात झंझावाती प्रचार दौरे केले. उमेदवारांची घोषणा करतानाच त्यांच्या नावापुढे त्यांच्या जातीचाही उल्लेख वंचितने केला. वंचित घटकांतील व्यक्तींना उमेदवारी देऊन अॅड. प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील जनतेला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आता वंचितच्या एकूण कामगिरीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात एकूण 3239 उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 288 मतदारसंघात एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून, तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यातून किती उमेदवार?

नंदूरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघांत 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचा फैसला 21 तारखेला ईव्हीएममध्ये बंद होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: