पंढरीच्या कायमस्वरूपी विकासासाठी आराखडा तयार होणार :जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

पंढरपूर, दि.१३- केवळ आषाढी व कार्तिकी वारीपुरते नियोजन न करता पंढरीत बाराही महिने येणार्‍या भाविकांसाठी कायमस्वरूपी विकासाचा आराखडा तयार केला जाणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी आठ दिवस जिल्हाधिकारी पंढरीत तळ ठोकून होते. तर प्रशासनाच्या सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे यंदाची वारी भाविकांसाठी सुखकर ठरली. दरम्यान पार पडलेल्या वारीचा आढावा घेण्यासाठी विश्रामगृह येथे प्रशासनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.भोसले यांनी, अनेक दिवसापासून वारीचे नियोजन केल्यामुळे तसेच भाविकांनी सहकार्य केल्यामुळे ते यशस्वी ठरल्याचे सांगितले. मागील काही वारीचा अनुभव पाहता पंढरीत कायमस्वरूपी विकास करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या तोंडावर पंधरा दिवस विविध सोयी सुविधा देण्यापेक्षा दैनंदिन येणार्‍या हजारो भाविकांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्यास याचा निश्‍चित फायदा त्यांना होईल. यामुळे पंढरीत येणार्‍या भाविकांची संख्या देखील वाढेल. कुंभमेळ्याला ज्या प्रमाणे मोठ्या सुविधा दिल्या जातात त्या प्रमाणे एक भक्तीचा कॅरीडॉर उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये भाविकांना जलद दर्शन हा महत्वाचा अजेंडा आहे.

दरम्यान यंदाच्या वारीत ३० हजार शौचालये भाविकांसाठी उपलब्ध होती, २१ आपत्कालीन कक्ष उभारली, ६५ एकरात जादा १४० प्लॉट भाविकांना दिले आदी महत्वाच्या सुविधा दिल्या. लवकरच पालखी मार्ग, पालखी तळ व नदीच्या कडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे. नातेपुते येथील पालखी तळाच्या जागेसाठी ३ कोटी ३३ लाख रूपयाचा मोबदला देण्यात आला आहे तर जुना अकलूज रस्ता करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली.

गाभार्‍यातील उपस्थितीबाबत नियम

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेवेळी श्री विठ्ठलाच्या गाभार्‍यात मंत्री व व्हिआयपी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याचा मुख्यमंत्र्यांसह मानाच्या वारकर्‍यांना देखील फटका बसतो. देवाचा गाभारा लहान असल्याने येथे अक्षरशः चेंगराचेंगरी होते. हे टाळण्यासाठी मंदिर समितीने गाभार्‍यात किती लोक असावेत यासाठी स्वतंत्र नियम करावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: