नक्षलवाद्यानी केलेल्या भुसुरुंग स्फोटात 16 जवान शहीद

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात नक्षलविरोधी पथकाचे १६ जवान शहीद झाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटाअगोदर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. शहीद जवानांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहीद झालेल्या १६ जवानांमध्ये एक गाडीच्या चालकाचा समावेश आहे.
तसेच या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. पहाटे वाहनांची जाळपोळ होण्याच्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले होते. मुख्यमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 पथकाचे 16 जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

admin: