दोनच वेळा जेवा, वजनवाढ आणि मधुमेह टाळा  डॉ.जगन्नाथ  दिक्षित , भगवंत व्याख्यानामाला बार्शी पुष्प पहिले 


बार्शी :  दिवस भरामध्ये कडक भूक लागल्यानंतर दोनच वेळा जेवल्यास लठ्ठपणा व मधुमेह टाळता येईल, असे मत ज्येष्ठ आहारतज्ञ व लठ्ठपणा आणि मधुमेह निर्मूलन अभियानाचे जनक डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी व्यक्त केले. 

येथील भगवंत मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व मातृभुमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामदैवत भगवंत जयंतीनिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत विना सायास वेटलॉस व डायबिटिस कंट्रोल या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी संयोजक संस्थांचे अध्यक्ष संतोेष ठोंबरे, फिजिशियन डॉ. गणेश सातपुते, साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी, उद्योजक सतीश अंधारे,उपाध्यक्ष गौतम कांकरिया व अमोल जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.  सहकार मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या व्याख्यानमालेच उद्घाटन करण्यात आले़ 

प्रास्ताविकामध्ये संतोष ठोंबरे यांनी बँकेची वाटचाल व मातृभुमी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सहकारमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोेष पाटील यांनी मनोगतामध्ये डॉ. दिक्षित यांच्या कार्याचे कौतुक करत शाकाहार काळाची गरज असल्याचे सांगितले. 

यावेळी व्याख्यानात डॉ. दिक्षित म्हणाले, ज्या समाजात माहितीचे रुपांतर ज्ञानात आणि शहाणपणात होत नाही. त्या समाजाची अवस्था वाईट होते. आजपर्यंतेच मानवी जीवन हे सहा लाख वर्षांपेक्षा अधिक काळाचे आहे. ज्ञात मानवी संस्कृतीचा इतिहास हा सुमारे पाच हजार वर्षाचा आहे. या जीवनप्रणालीत उपवासाला महत्व होते.मात्र आजकाल माणूस जीभे पुढे लाचार झाला आहे. मिळेल ते, वाट्टेल तितके खाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आहारावर नियंत्रण उरलेले नाही. एकवेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी आणि तीन वेळा जेवतो तो रोगी असे पुर्वांपार म्हटले आहे. अतिरिक्त खाण्यामुळे लठ्ठपणा व त्यातून मधुमेह वाढतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेह वाढल्यास कालांतराने इन्शुलीनचे इंजेक्शन घेण्याची पाळी येते. शरीरावर मधुमेहाचे दुष्परिणाम होतात. याबाबत ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मांडलेल्या सिध्दांतानुसार त्यांच्या जयंतीनिमित्त मी दोनच वेळा जेवण्याचा डायट प्लान जानेवारी २०१७ साली मांडला. आज तो ३७ देशातील ५० हजारांहून अधिक लोकांपर्यत पोहचला आहे. मधुमेह दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये बालपणापासूनचे मधुमेही असतात. त्यांनी हा डायट प्लान करु नये, तसेच गरोदर महिला व अपत्यांना स्तनपान करणाºया महिलांनी हा हा प्लान करु नये.

डायट प्लाट बाबत डॉ. दिक्षित म्हणाले, आपल्याला केंव्हा भुक लागते हे ओळखून नियमितपणे त्याचवेळी जेवायचे. दोन जेवणाच्या अंतरामध्ये काहीही खायचे नाही. फारच आवश्यकता वाटली तर भरपूर पाणी प्यावे. तसेच घरी बनवलेले ताक, काळा चहा, ग्रीन टी, शहाळ्याचे पाणी, एखादे टोमॅटो खाता येईल. प्रारंभी हा डायट प्लान अंगीकारणे अवघड वाटले तरी तो अंमलात आणणे शक्य आहे. तसेच दिवसातून एकदा किमान साडेचार कि.मी. चालण्याचा किंवा सायकलींग अथवा पोहण्याचा व्यायाम करावा. मधुमेही व्यक्तींनी गोड अजिबात खावू नये. साखर हा पदार्थ नव्हे तर तो घटक आहे, हे लक्षात घेवून त्याला गूळ किंवा आर्गेनिक गूळ असा पदार्थ निवडून तो खावू नये. गोड फळे खावू नयेत. वर्षानुवर्षे वजन वाढलेल्या  व्यक्तीमध्ये लगेच वजन कमी होणार नाही. त्यामुळे किमान तीन महिन्यानंतर या डायट प्लानचे परिणाम दिसतील व वजन घटेल. हा डायट प्लान करणाºया समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींचे वजन घटून मधुमेहाचे पुर्णपणे  निर्मूलन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. खाण्यावर नियंत्रणाबाबत विशेषत महिलांनी वाया जाते म्हणून खाण्याची सवय सोडून द्यावी. असे आवाहन त्यांनी केले. 

तसेच हा डायट प्लान आचरण्यापुर्वी मधुमेही व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असेही त्यांनी सांगितले. या व्याख्यानाला बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती. सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर आ•ाार संस्थेचे उपाध्यक्ष शहाजी फुरडे-पाटील यांनी मानले़  कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद कांबळे  व त्यंची टिम परिश्रम घेत आहे.


admin: