दिलीप सोपल यांच्या विजयासाठी बार्शीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

ग्लोबल न्यूज नेटवर्क : बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सोमवार १४ ऑक्टोबर रोजी जुना गांधी पुतळा, पांडे चौक येथे सभा पार पडणार असल्याची माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे.

तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आंधळकर यांनी केले आहे.

शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प शिवसेना – भाजप सह सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची सभा आणि दिलीप सोपल यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी दसऱ्याला सर्व शिवसैनिकांचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाऊसाहेब आंधळकर व नागेश अक्कलकोटे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवाय सोपल यांच्या प्रचारासाठी महायुती मधील राज्य स्तरावरील मोठ्या नेत्यांच्या सभा देखील होणार आहेत. सध्या प्रचारासाठी दिलीप सोपल, युवराज काटे, आर्यन सोपल हे मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी वर भर देत आहेत.

बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना – भाजप महायुतीकडून दिलीप सोपल यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या विरुध्द राजेंद्र राऊत हे अपक्ष लढत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. दिलीप सोपल यांना शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर आणि भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांची खंबीर साथ मिळत आहे. त्यादृष्टीने मिरगणे यांनी देखील भाजपची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा निश्चय केला आहे.

आंधळकर व मिरगणे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सोपल यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार असल्याचं सांगितले होते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: