‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे. पहिल्या आठवड्यातच 100 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट आता 200 कोटींकडे वेगाने सरकत आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सामान्य लोकांसह तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही चित्रपटगृहामध्ये पोहोचले. यामुळे भारावलेल्या अजय देवगण याने आभार व्यक्त केले आहेत.

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण याने सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री काजोल आणि सैफ अली खानही दिसतो. देशाचा हा धगधगता इतिहास पाहण्याची इच्छा तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही मोडू शकले नाही. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल राकेश कुमारसिंह भदौरिया यांनी रविवारी एकत्रच हा चित्रपट पाहिला

तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख दिल्लीतील एका चित्रपटगृहामध्ये ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट पाहण्यासाठी एकत्र गेले. यावेळी अभिनेता अजय देवगणही उपस्थित होता. तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी अजय देवगण याच्यासोबत फोटोही काढले.

नौदलाचे माजी अधिकारी हरिंदर सिक्का यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिक्का यांचे ट्वीट रिट्विट करत अजय देवगण याने तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांचे आभार मानले आहेत. ‘तिन्ही दलाच्या सैन्य प्रमुखांनी माझा चित्रपट पाहणे अभिमानास्पद आहे. तान्हाजी चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे धन्यवाद’, असे ट्वीट अजय देवगण याने केले आहे.

100 वा चित्रपट
‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा अजय देवगण याचा 100 वा चित्रपट आहे. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: