ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे देहावसान

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे 17 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला देहावसान झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले.

मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ’नाटक’ शिकवले.

“वेडी माणसं” ह्या इ.स. 1955 साली, म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्‍नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. इ.स. 2014 साली रत्‍नाकर मतकरी यांच्या नावावर 31 कथासंग्रह होते.

मतकरींची ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.

रत्नाकर मतकरी यांच्या ‘निर्मनुष्य’ या कथासंग्रहातील ‘भूमिका’ या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग 2017 सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.

2001 साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे.

मतकरी यांची साहित्य संपदा

अचाटगावची अफाट मावशी (बालसाहित्य)
अजून यौवनात मी (नाटक)
अ‍ॅडम
अंतर्बाह्य
अपरात्र (कथासंग्रह)
अलबत्या गलबत्या (नाटक, बालसाहित्य)
अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर (बालसाहित्य)
अलल् घुर्र घुर्र (बालसाहित्य)
अंश (कथासंग्रह)
आचार्य सर्वज्ञ (नाटक, बालसाहित्य)
आत्मनेपदी (लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, स्वतःवर प्रभाव टाकणाऱ्या माणसांबद्दल लिहिलेले मनोगत)
आम्हाला वेगळं व्हायचंय (नाटक)
आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)
आरशाचा राक्षस (बालनाट्य)
इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन – रत्‍नाकर मतकरी)
इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक : अरविंद जोशी)
एक दिवा विझताना (कथासंग्रह)
एक होता मुलगा (बालनाटक)
ऐक टोले पडताहेत (गूढकथासंग्रह)
कबंध (कथासंग्रह)
कर्ता-करविता (नाटक)
कायमचे प्रश्न (वैचारिक)
खेकडा (कथासंग्रह)
खोल खोल पाणी (नाटक)
गहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)
गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)
गांधी : अंतिम पर्व (नाटक)
गोंदण (कथासंग्रह)
घर तिघांचं हवं
चटकदार – ५+१ (बालसाहित्य)
चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)
चमत्कार झालाच पाहिजे ! (बालसाहित्य)
चार दिवस प्रेमाचे (ललित)
चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)
चोर आणि चांदणं (चतुर सारिकेचा वग, चोर आणि चांदण, प्रेमपुराण आणि बेडरूम बंद या चार विनोदी एकांकिकांचा संग्रह)
जस्ट अ पेग (एकांकिका)
जादू तेरी नझर (नाटक)
जावई माझा भला (नाटक)
जोडीदार
जौळ (कथासंग्रह)
ढगढगोजीचा पाणी प्रताप (बालसाहित्य)
तन-मन (नाटक)
तृप्त मैफल (कथासंग्रह)
दहाजणी
दादाची गर्ल फ्रेंड

2 बच्चे 2 लुच्चे (बालसाहित्य)
धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी (बालसाहित्य)
निजधाम (कथासंग्रह)
निम्माशिम्मा राक्षस (बालसाहित्य)
निर्मनुष्य (कथासंग्रह)
निवडक मराठी एकांकिका
परदेशी (कथासंग्रह)
पानगळीचं झाड
पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका
प्रियतमा (नाटक)
प्रेमपुराण (एकांकिका)
फॅंटॅस्टिक
सरदार फाकडोजी वाकडे (बालसाहित्य)
फाशी बखळ (कथासंग्रह)
बकासुर (नाटक)
बारा पस्तीस
बाळ, अंधार पडला
बृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन 2011 – भाषण
बेडरूम बंद (एकांकिका)
ब्रह्महत्या
भूत-अद्‌भुत (बालसाहित्य)
मध्यरात्रीचे पडघम (कथासंग्रह)
महाराजांचा महामुकुट (बालनाट्य)
महाराष्ट्राचं चांगभलं (ललित)
माकडा माकडा हुप ! (बालसाहित्य)
मांजराला कधीच विसरू नका (नाटक, बालसाहित्य)
माझे रंगप्रयोग (704 पानी ग्रंथ – आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)
माणसाच्या गोष्टी भाग 1, 2.
मृत्युंजयी (गूढकथासंग्रह)
यक्षनंदन
रंगतदार (आचार्य सर्वज्ञ, आरशाचा राक्षस, एक होता मुलगा, महाराजांचा महामुकुट, मांजराला कधीच विसरू नका !, राजकन्येचा कावळ्याचा फार्स, हुशार मुलांचे नाटक या बाल-नाटिकांचा संग्रह)
रंगयात्री
रंगरूप-रंगभूमी चिकित्सा
रंगांधळा (कथासंग्रह)
रत्‍नपंचक
शब्द ..शब्द ..शब्द
शांततेचा आवाज (ललित)
शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))
संदेह (कथासंग्रह)
संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)
सहज (कथासंग्रह)
साटंलोटं (नाटक)
सुखान्त (नाटक)
सोनेरी मनाची परी
सोनेरी सावल्या (ललित)
स्पर्श अमृताचा (नाटक)
स्वप्नातील चांदणे (परिकथासंग्रह)
हसता हसविता (ललित)
हुशार मुलांचे नाटक (बालनाटिका)

ग्लोबल न्युज नेटवर्क: