ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे देहूहून प्रस्थान

देहू : – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. राज्याच्या कानाकोप-यातून आलेले लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले.

हातात भगव्या पताका घेऊन आषाढी वारीसाठी जमलेल्या वारक-यांनी केलेला टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम च्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली. वारक-यांनी संत तुकाराम महाराज मुख्य
देऊळवाडा परिसरात पालखी सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला.

राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारक-यांनी पहाटेपासूनच देऊळवाड्यात मोठी गर्दी केली होती. इंद्रायणी घाट परिसर वारक-यांनी फुलुन गेला होता. पालखी सोहळ्याचे कार्यक्रम पहाटे साडेचार वाजल्यापासूनच सुरु झाले. पहाटे पाच वाजता
महापुजा झाली. भजनी मंडपात सकाळी दहा वाजता रामदास नाना कदम यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे किर्तन झाले.

सकाळी साडेदहा वाजता देहूतील घोडेकर बंधू(सराफ) यांनी चकाकी देऊन तुकोबारायांच्या पादुका इनामदारवाड्यात आणल्या. पादुकांची पुजा करण्यात आली. मानकरी म्हसलेकर दिंडीने डोक्यावर पादुका घेवून, संबळ, टाळमृदंगाच्या गजरात वाजतगाजत भजनी मंडपात आणल्या.

दुपारी अडीच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पादुकांची पुजा झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. मोहिते पाटील व बाभुळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. त्यानंतर देहुवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदक्षिणा सुरु झाली. वारकरी ज्ञानोबा- तुकाराम नामघोष करत आनंदाने नाचत होते. फुगड्या धरत होते.

प्रदक्षिणासाठी मानाच्या दिंड्या, मानाचे अश्व, खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार सज्ज होते. देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा पुर्ण झाल्यानंतर तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी स्थळी संत तुकोबारायांच्यापादुकांची भेट घडविण्यात आली.

त्यानंतर सायंकाळी पालखी
इनामदार वाड्यात मुक्कमी पोहोचली. उद्या मंगळवार(२५) रोजी सकाळी ११ वाजता पालखी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होईल.

admin: