घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवलेत, मी फक्त चावी मारतो! उद्धव ठाकरेंचा चिमटा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांचा आज शिवसेनेत दणक्यात प्रवेश झाला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगदी ठाकरे शैलीत चिमटा घेतला. ते म्हणाले की, ‘घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवलेत मी फक्त चावी मारण्याचे काम करतो. हे आले असले तरी त्यांचे पक्षाध्यक्ष येतील असे वाटत नाही.’

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. त्यानंतर खुद्द अहिर यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याचे जाहीर केले. ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी सचिन अहिर यांच्यासोबत बरेच दिवस चर्चा सुरू होती.
मुंबई-महाराष्ट्रासाठी काम करण्यावर चर्चा झाली. एकत्र येऊन काम करण्याचा विचार झाला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर बोलताना सचिन अहिर यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात सांगितली. ‘चांगली लोकं येताहेत, त्यांना येऊ तर द्या. यातून शिवसेना, मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढते आहे. राजकारण करताना एक वृत्ती बाळगावी लागते. नुसता पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही राजकारण हे राजकारणाप्रमाणे करायचे असते. नीतीमत्ता गहाण ठेवून, सोडून मी काही राजकारण करणार नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. आपल्या इथे येण्याचा पश्चाताप होणार नाही अशी खात्री देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं फोडलेली माणसं नको, मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही यात्रा युतीच्या विजयासाठीच!

निवडणुका लढण्यासाठी, जिंकण्यासाठी जनतेत जावं लागतं. त्यामुळेच आदित्य ठाकरे जनआशीर्वादच्या निमित्ताने जनतेत जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत सहभागी झालो तरी आम्हाला प्रश्न विचारले जातील, सहभागी झालो नाही तरी देखील प्रश्न विचारले जातील. पण तसे काहीच नाही. मी आधीच सांगितलं आहे आमचं ठरलं आहे. काही गोष्टी मी आणि मुख्यमंत्री ठरवत असतो आणि त्याप्रमाणेच करत असतो. त्यामुळे या यात्रा युतीच्या विजयासाठी आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: