गणेशोत्सवा पूर्वीच संपूर्ण भुजबळ कुटुंब शिवसेनेत प्रवेशाच्या तयारीत

मुंबई । विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतं आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील झाले आहेत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रचंड मोठा धक्का बसणार आहे. ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.

याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती पण आता सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, संपूर्ण भुजबळ कुटुंबच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ते देखील गणेशोत्सवाआधीच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत. तुमच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असा थेट प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले मै यही हु, मै यही हु, मै यही हु. पण शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचं खंडन मात्र त्यांनी केलं नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वछभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरुच असून येत्या 01 तारखेला भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला भारतीय जनता पक्ष मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 सप्टेंबरला सोलापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रावादीचे माजी खासदार धंनजय महाडीक यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण भाजपमधे प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे ह्या काल नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्या दोन दिवसीय या दौऱ्यात स्वागत, विविध कार्यक्रमांत माजी खासदार समीर भुजबळ व त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांचा सहभाग होता. मात्र छगन भुजबळ या दौऱ्यात सहभागी नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांचा 24 ऑगस्टचा शिवसेना प्रवेशाचा मुहुर्त टळल्यावर शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: