खा.रणजितसिंह निंबाळकर यांची माढा मतदारसंघातील विविध प्रश्‍नी अमित शहां बरोबर चर्चा

फलटण  – माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांसंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. मतदारसंघातील पाणी आणि रेल्वे प्रश्‍नावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश अमित शहा यांनी यावेळी दिल्याचे खासदारांनी स्पष्ट केले.


खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या ऑफिसमध्ये शहा यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. माढा मतदारसंघातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित कामे तसेच फलटण- बारामती व फलटण- पंढरपूर रेल्वेच्या प्रश्‍नाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने सविस्तर चर्चा केली.

याबाबत संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधून हे प्रश्‍न सोडवण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. माढा लोकसभा मतदारसंघातील इतर विविध प्रश्‍नांबाबतही सविस्तर चर्चा करताना या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळविल्याबद्दलनिंबाळकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली. या मतदारसंघातील विविध कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारसंघातील दुष्काळी तालुक्‍यांचा दुष्काळ कायमस्वरुपी पुसण्यासाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही अमित शहा यांनी दिल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: