एअर इंडिया’ पुन्हा ताब्यात आल्यानंतर रतन टाटा भावूक,म्हणाले…

एअर इंडिया’ पुन्हा ताब्यात आल्यानंतर रतन टाटा भावूक,म्हणाले…

तब्बल 68 वर्षानंतर ‘एअर इंडिया’ ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आली आहे. टाटा समूहाने या सरकारी विमान कंपनीसाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली. केंद्र सरकारने या बोलीवर मोहोर उमटवल्यानंतर टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा भावूक झाले.

रतन टाटा यांनी एक ट्वीट करत ‘वेलकम बॅक, एअर इंडिया’ असे म्हटले. तसेच टाटा सन्सने एअर इंडियाची बोली जिंकल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. या ट्वीटसोबत त्यांनी 1932 मध्ये एअर इंडियाची सुरुवात करणाऱ्या जेआरडी टाटा यांचा या विमानासोबतचा एक फोटो आणि संदेशही शेअर केला.

आपल्या संदेशामध्ये रतन टाटा म्हणाले की, एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाकडे आली ही एक चांगली बातमी आहे. एअर इंडियाची पुर्नबांधणी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. तसेच एव्हीएशन मार्केटमध्ये टाटा समूहाला अधिक उंची मिळवून देण्याची ही एक चांगली संधी आहे, असे रतन टाटा म्हणाले.

जेआरडी टाटा आनंदी झाले असते

एअर इंडियाचे जनक जेआरडी टाटा यांचीही आठवण यावेळी रतन टाटा यांनी काढली. एकेकाळी जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया ही विमान कंपनी देशातील सर्वात प्रतिष्ठीत विमान कंपनी होती. आता या विमान कंपनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची संधी टाटा समूहाकडे आली आहे. तसेच आज जेआरडी टाटा असते तर खूप आनंदी झाले असते, असेही रतन टाटा यांनी म्हटले. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार, असेही ते म्हणाले.

18 हजार कोटींची बोली

दरम्यान, टाटा समूहाकडून 18 हजार कोटींची बोली लावत एअर इंडिया खरेदी केली आहे. त्यापैकी 15 हजार 300 कोटींची रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाणार असून उर्वरित रक्कम केंद्र सरकारला मिळणार आहे, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: