उस्मानाबाद शहरातील भिंती बोलक्या होणार;साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचे आयोजन

उस्मानाबाद शहरातील भिंती बोलक्या होणार;साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचे आयोजन

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचे आयोजन

उस्मानाबाद: साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील भिंती बोलक्या होणार आहेत. रेखाचित्र, अक्षरचित्र, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती यांसह संत साहित्याच्या मौलिक विचारांचे रेखाटन राज्यभरातील कलाकार मंडळी साकारणार आहेत. संमेलनाचे औचीत्य साधून शहर आणि परिसरातील ओसाड भिंतींना बोलके करण्यासाठी राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावरून गौरविण्यात येणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने आयोजित 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी उस्मानाबाद शहरात पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संयोजन समितीच्यावतीने अनेक नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, 7 जानेवारी रोजी राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत उस्मानाबादसह परिसरातील कलाशिक्षक, विद्यार्थी यांच्यासह लातूर, सोलापूर येथील चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच राज्यभरातील कलाकार सहभागी होणार आहेत. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सर्व वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक, कलाशिक्षक, चित्रकार, छंद चित्रकारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता साहित्य संमेलन कार्यालयातुन या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येईल.

उस्मानाबाद नगरपालिकेच्यावतीने शहरातील भिंतींना पांढरा रंग देऊन लख्ख करण्यात आले आहे. त्यावर राज्यभरातील कलाकार आकर्षक कलाकृती स्पर्धेच्या निमित्ताने साकारतील. स्पर्धेसाठी विविध शहरांतून येणार्‍या मान्यवर कलाकारांना प्रवास खर्च संयोजन समितीच्यावतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर रेखाटनासाठी लागणारा रंग देखील संयोजन समितीच्यावतीने पुरविण्यात येणार आहे.

मंगळवार, 7 जानेवारी रोजी स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वांना अल्पोपहार व एकवेळच्या जेवणाची व्यवस्था संमेलन संयोजन समितीच्यावतीने केली जाणार आहे. विषय साहित्य विषयी , सामाजिक उपक्रम , वनीकरण , सामाजिक संदेश , पाणी वाचवा ,संत गोरोबाकाका जीवनपट तसेच साहित्यविषयक अक्षरलेखन साहित्यविषयक ओव्या साहित्यिकांचे रेखाचित्र इत्यादी अनेक समाज संदेश विषयावर चित्रण करावयाचे आहे .

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थी, शिक्षक, चित्रकार यांनी परिसर व मंच सुशोभिकरण समितीचे समन्वयक शेषनाथ वाघ (मो. 8806665253), विजय यादव (मो. 9403954780), विजय कुंभार (मो. 8275304733) आणि राजकुमार कुंभार (मो. 7709326019) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष नीतीन तावडे आणि कार्यवाह रवींद्र केसकर यांनी केले आहे. शहर व परिसरातील विद्यार्थी आणि कलाशिक्षकांनी देखील मोठ्या संख्येने साहित्य संमेलनात सहभागी सर्व कलाकार आणि विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही संयोजन समितीच्यावतीने नमुद करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: