आता संसदेच्या अधिवेशनात गंभीर खटले असणारे लोक दिसणार-शरद पवार

ग्लोबल न्यूज नेटवर्क; आज देशात काही राज्ये वगळता सांप्रदायिक ताकदी वाढल्या असल्याचे आपल्याला दिसते. संसदेत धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, अशांतता माजवणारे लोक वाढले आहेत. संसदेचे अधिवेशन लवकरच सुरू होईल, तेव्हा यांची भूमिका काय आहे ते दिसेलच.. पण यावेळी ज्यांच्यावर गंभीर खटले आहेत असे लोक संसदेत असणार आहेत असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार म्हणाले, आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. याच दिवशी वीस वर्षांपूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये पक्षस्थापनेची घोषणा केली होती.
आपला पक्ष आज २१व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपण अनेक वर्षे राज्यात सत्ता उपभोगली आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवली. लोकांचे प्रेम आपल्यावर आहेच.. पण याला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली. हा पक्ष तुमच्यामुळे उभा आहे.

एकीकडे कार्यकर्ते काम करत आणि दुसरीकडे आपले मंत्री लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत. लोक म्हणायचे की, काम करावे तर राष्ट्रवादी सारखे.. सत्तेचा काळ गेला आहे आणि आपल्या विरोधी विचारातील लोक आज सत्तेत आहेत. पण आपली विचारधारा ही गांधी, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा असल्याचे ही पवार यांनी आवर्जून सांगितले.

भाजपाने गंभीर खटले नावावर असलेल्या लोकांना तिकीट दिले आणि ते लोक आता निवडून दिले आहेत. मालेगाव स्फोटात काही अल्पसंख्याक तरूणांना जाणूनबुजून पकडण्यात आले, असे मला वाटते, मी ही भावना व्यक्तही केली होती. कोणताही मुस्लिम जुम्म्याच्या दिवशी मशिदीच्या परिसरात स्फोट घडवणार नाही, अशी माझी भावना आहे.

काही लोक मुस्लिम लोकांना भारत सोडून जा सांगतात. हा देश काही तुमची वैयक्तिक जहांगीर नाही. देशाचे नेतृत्व करणारे लोक अशा विचारधारेच्या लोकांची अडवणूक करत नाहीत, म्हणून असे विचार वाढीस लागतात. सत्तेचा उपयोग एखाद्या धर्माच्या प्रसारासाठी करणारा असा पंतप्रधान भारताने याआधी कधी पाहिला नाही. पंतप्रधान सर्व सहिष्णू तत्त्वांना तिलांजली देत असताना भगवी वस्त्रे घालून, गुहेत जाऊन, तुम्ही देशाला कोणता संदेश देताय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामीण भागातील पक्ष म्हणून ओळख आहे. आपली ही ओळख जपायची आहेच.. मात्र आज प्रत्येक तालुक्यात शहरी भाग वाढला आहे, नागरीकरण वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळात आपल्याला या शहरी भागांकडेही जास्त लक्ष द्यावे लागेल.

निवडणुकांच्या दृष्टीकोनातून आज प्रचाराचे सूत्र बदलले आहे. सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. आपण ही प्रबावी अस्त्रे वापरून योग्य पद्धतीने वापरून निवडणुकीची जोमाने तयारी करायला हवी.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने आज जलसंकल्पाचा आगळा-वेगळा कार्यक्रम घेतला त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, पाण्याची जाण सर्वांनाच झालीच पाहिजे, हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आपण झटूया असे आवाहन पवार यांनी केले.

admin: