आज राहुल गांधी यांचा वाढदिवस,जाणून घ्या राहुल गांधी यांच्याविषयी

ग्लोबल न्यूज नेटवर्क:  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज जन्मदिन आहे. 19 जून 1970 रोजी राहुल गांधी यांचा दिल्लीत जन्म झाला. देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यात जन्म, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल हे  बहीण प्रियंका यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत.

1984 मध्ये आजी इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा ते केवळ 14 वर्षांचे होते. आजीच्या मृत्यूचा आघात विसरायला होतो न होतो तोच 1991 मध्ये वडील राजीव गांधी यांची पंतप्रधानपदावर असताना झालेली हत्या त्यांनी पाहिली. त्यावेळी राहुल 21 वर्षांचे होते. कुटुंबातील या दोन जिवलगांच्या हत्या पचवून राहुल गांधींना त्यांचे शिक्षण पूर्ण करावे लागले.

‘या ’ कारणामुळे लपवावी लागली होती ओळख

राहुल गांधी यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झालं. तर पुढील शिक्षणासाठी राहुल गांधी यांना देहरादूनमधील दून स्कूलमध्ये पाठवण्यात आलं.

1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीनंतर सुरक्षेच्या कारणामुळे राहुल यांना घरात राहूनच शिकावे लागले.

1989 मध्ये राहुल गांधींनी दिल्लीतील सेंट स्टिफन कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं होतं. मात्र, येथेही सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता आले नाही. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले.

दिल्लीतील शिक्षण संपल्यानंतर राहुल गांधींनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना शिक्षण सोडून यावे लागले.

हॉवर्ड येथील शिक्षण झाल्यावर राहुल गांधींनी फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1994 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

सुरक्षा कारणांमुळे फ्लोरिडा येथील शिक्षणादरम्यान राहुल गांधी यांची ओळख फक्त विद्यापीठ आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती. येथे ते रॉल विन्सी या नावाने वावरत होते.

1995 मध्ये राहुल गांधींनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम.फिल. पूर्ण केलं.
ग्रॅज्यूएशन आणि एम.फिल पूर्ण झाल्यावर राहुल गांधींनी तीन वर्षे लंडनमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्मच्या मॉनिटर ग्रुपमध्ये काम केलंय. तेथेही सुरक्षेचे कारण देत त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आली नव्हती.

राहुल गांधी 2002 मध्ये भारतात परतले. भारतात आल्यानंतर मुंबईतील टेक्नॉलॉजी आऊटसोर्सिंग कंपनी बॅकअप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदी त्यांनी काम पाहिलं.

2004 मध्ये राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केला. गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आणि वडील राजीव गांधी ज्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते त्या अमेठीमधून 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

2014 पर्यंत गांधी घराण्याच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी हिसकावला. तथापि, राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले आहेत.

धिरज करळे: