अमित शाह यांच्या नेतृत्वातच होणार महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या विधानसभा निवडणुका

नवी दिल्ली । आगामी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. या वर्षाच्या अखेरीस झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ही तिन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेत प्रचंड विजय मिळवत तब्बल 303 जागा जिंकल्या. अमित शाह गृहमंत्री बनल्यानंतर जे.पी. नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नवे अध्यक्ष आणि पूर्ण देशातील संघटनेतील निवडणुकीसाठी भाजपने राधामोहन सिंह यांच्या नेतृत्वात निवडणूक समितीची स्थापना केली आहे.

परंतु पूर्ण देशभरातील संघटनेच्या निवडणुकीत उशीर झाल्याने राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक 15 डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार संघटनेतील निवडणूक प्रक्रिया 11 सप्टेंबरपासून सुरू होईल. 11 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान मंडळ स्तरावरील अध्यक्षाची निवडणूक संपन्न होईल. तर 1 ते 15 डिसेंबरपर्यंत प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका होतील.

स्थानिक आणि राज्यस्तरीय संघटनेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होईल. याची प्रक्रियाही 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत चालू शकते. यामुळे भाजपचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष 15 डिसेंबरनंतरच निश्चित होतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: