“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून…” – अरविंद केजरीवाल

 

नवी दिल्ली | उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बोट ठेवले आहे.

दिल्लीच्या नारिकांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गरजेपेक्षा चारपट ऑक्सिजन मागून घेतला. दिल्लीला पुरवठा करण्यात आलेला ऑक्सिजन आणि प्रत्यक्ष वापर यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याला उत्तर देत केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

मी दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो, हा माझा गुन्हा आहे. जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा करत होता त्यावेळी मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो. नागरिकांना ऑक्सिजन मिळण्यासाठी भांडलो, हात पसरले, विनंत्याही केल्या. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमावावं लागलं आहे. त्यांना खोटारडे म्हणू नका, त्यांना फार वाईट वाटत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. तसेच हा रिपोर्ट भाजपच्या मुख्यालयातून तयार करण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.

Team Global News Marathi: