काँग्रेसला राजकीय रणनीतिकार भेटणार? सोनिया गांधी घेणार मोठा निर्णय
नवी दिल्ली : प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस (Congress) सकारात्मक आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून मागे पडलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा कंबर कसायला सुरुवात केली आहे. पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसह काँग्रेस २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. आता प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे सल्लागारपदी दिसण्याची शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर, प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पाहिजे असल्याने त्यांनी काही पर्याय पक्षश्रेष्ठीला सुचवले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या सल्लागारपदाची जबाबदारी कोणालाही दिलेली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याकडे राजकीय सल्लागारपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.
प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समिती स्थापन करण्याचे सुचवले आहे. ही समिती निवडणूक प्रचार किंवा इतर राजकीय रणनीतीबाबत अंतिम निर्णय आघाडीसोबत घेईल. अंतिम निर्णय झाल्यानंतर हा प्रस्ताव शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ समितीसमोर ठेवला जाईल, असे प्रशांत किशोर म्हणाले.