शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या आणखी एका जवळच्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरूनच आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सूचक ट्विट केले आहे.
अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे??, असं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत भाजपाच्या भ्रष्टाचारी नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी आयकर विभागानं मुंबईत शिवसेना नेत्यांच्या घरी धाडसत्र सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.
अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 8, 2022
भाजपा आमदार अतुल भातखळकर ट्विटवर नेहमी सक्रीय असतात आणि शिवसेनेवर घणाघाती टीका करताना अनेकदा पाहायला मिळले आहे. आज सकाळी त्यांनी मुंबईत आयकर विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचं ट्विट केलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी आयकर विभाग संपूर्ण माहितीनिशी काम करत असतं त्यामुळे यात राजकारण आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले.