Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

स्टेटसचा विचार सहजीवनात आणायचा नाही, हे आम्हाला ठरवावे देखील लागले नाही

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 28, 2022
in राजकारण
0
स्टेटसचा विचार सहजीवनात आणायचा नाही, हे आम्हाला ठरवावे देखील लागले नाही

स्टेटसचा विचार सहजीवनात आणायचा नाही, हे आम्हाला ठरवावे देखील लागले नाही

किशोर रक्ताटे-

अर्धेजग – आज किशोर रक्ताटे-तेजस्वी सातपुते यांचा लग्नाचा वाढदिवस

किशोर रक्ताटे-तेजस्वी सातपुते

 

 

२८ जून २०१२ला तेजू (तेजस्वी सातपुते) आणि मी विवाहबद्ध झालो. आमची लग्नाआधीची मैत्री तब्बल साडेतीन वर्षांची. आता आम्ही एकमेकांच्या आयुष्याचे साथीदार म्हणून कायमचे मित्र बनलो आहोत. आमचा विवाह आम्हा उभयंतासांठी लव-मॅरेज आहे. मात्र आमच्या कुटुंबियांसाठी ते अ‍ॅरेंज मॅरेज आहे. आम्ही आमच्या विवाहाला लव-मॅरेज मानतो, याचे कुटुंबियांना दुःख नाही आणि ते आमच्या विवाहाला अ‍ॅरेंज मॅरेज मानतात यात आम्हाला काहीही अडचण वाटत नाही.

 

आमची कुटुंब प्रथा, परंपरा व संस्कृतीच्या प्रेमात अडकलेली आहेत. आम्हीही त्यातच वाढलो आहोत. पदवीच्या शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही घर सोडले. बाहेरच्या मुक्त अवकाशात आमचा वावर वाढला. मुक्त अवकाश बघून-समजून आमच्या समजुतीच्या कक्षा रुंदावल्या. चांगल्या आणि मानवी जीवनाच्या विविध व्यवहारांना नैतिक बंधने घालून आवश्यक वळण देणाऱ्या पारंपरिक गोष्टींचा आम्हालाही तितकाच जिव्हाळा. फरक फक्त एवढाच चालत आलेय म्हणून करायला किंवा मानायला आमची तयारी नसते. आमच्या दोघांच्या कुटुंबियांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येतो, तो शेतीप्रधान ग्रामीण जीवनाशी. आमच्या जवळच्या बहुसंख्य नातेवाईकांना लग्नाआधीची ओळख, मुला- मुलींची मैत्री… या न पटणाऱ्या आणि आवाक्याबाहेरच्या गोष्टी. पण तरीही या सर्व गोष्टींवर मात होऊ शकली ती तेजूच्या आई-वडिलांच्या तेजूवरील विश्वासाने आणि माझ्या घरच्यांनी मला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे… आमची एकमेकांबाबतची आत्मीयता, नात्यावरची निष्ठा व कुटुंबियांना विश्वासात घेऊन टाकलेले पाऊल त्यांनी लक्षात घेतले अन् आमच्या एकत्र येण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. एकमेकांवर विश्वास असलेल्या दोन जीवांच्या सहजीवनाचा मार्ग मोकळा झाला.

ग्रामीण भागातील सर्वसाधारण शैक्षणिक-सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेली आमची कुटुंबं. माझे वडील पोलीस दलात शिपाई होते… त्यांच्या नोकरीमुळे काही दिवस का होईना माझ्या कुटुंबाचा वावर शहरात गेल्याने किमान शिक्षणाचे महत्त्व आमच्याकडे आले होते. तेजूच्या आई प्राथमिक शिक्षिका असल्याने आणि वडील व्यवसायात असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणलेले असल्याने तेजूला उच्च शिक्षणाची दारे उघडी झाली. तेजूचे वडील तसे व्यावसायिक आणि प्रचलित शिक्षण व्यवस्थेत फारसे न रमलेले, मात्र कैक पदव्या मिळवणाऱ्यांची मती गुंग करणारे. व्यावहारिक जगातील माहीम माणूस.

 

उदारमतवादी जगाने जन्माला घातलेल्या आधुनिकतेचा आमच्या कुटुंबाला तसा लवलेशही नाही. मात्र त्यांना त्यांच्या मानसिकतेनुरूप जर पटवून सांगितले तर ते कुठलीही आधुनिकता स्वीकारायला तयार होतात. आम्ही आमच्या लग्नाचा विषय कुटुंबियांना विश्वासात घेऊन सांगितल्यानेच ते आमच्या पाठीशी उभे राहिले. सर्व काही विनासायास पार पडले.

तेजूची अन् माझी पहिली भेट २००९ च्या प्रजासत्ताक दिनी झाली. आम्ही भेटलो ट्रेकच्या निमित्ताने. ढाक भैरी या ठिकाणी आमचा ट्रेक गेला होता. त्यावेळी मी रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझमचा डिप्लोमा आणि राज्यशास्त्र विषयात एम.फिल. करत होतो तर तेजू पुण्याच्या आर.एल.एस. महाविद्यालयातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत होती. अवघा एकदिवसीय ट्रेक होता. एका दिवसाच्या भेटीने कुणातही मैत्री होऊ शकेलच असे नाही. मात्र नाती घट्ट करणारे काही धागे असे असतात की, ज्यामुळे मैत्री व्हायला दिवस तर खूप झाला, काही तासांतच ती होऊ शकते. आमच्यात अगदी तसेच झाले. त्याचे खरे कारण आमचा नगरी धागा… माझ्या गप्पाडदास स्वभावाने आणि तेजूच्या मनमिळावू स्वभावाने आमच्यात मैत्रीची एक वीण उभी केली.

तिथून पुढचा संपर्क तसा जुजबी आणि फोनवरचा… भेटी विरळच पण परिणामकारक… पहिल्या भेटीने तेजूविषयी माझ्या मनाला काहीतरी वेगळीच जाणीव करून दिलेली होती… त्याचाच भाग म्हणून अधून-मधून तेजूचे काय चाललेय हे मी जाणून घेत राहिलो… त्या त्या निमित्ताने आम्ही बोलत राहिलो… त्या बोलण्यातून एकमेकांना थोडक्यात कळत गेलो… तेजू भेटण्याच्या अगोदर माझ्याभोवती बरा परिचय असलेल्या असंख्य मुली होत्या. त्यापैकी मैत्रीणीची जागा घेतलेल्या विरळच… तेजूच्या बोलण्यातील आत्मविश्वास, विचारातील स्पष्टता, कुटुंबियांबद्दलची आत्मीयता, आणि एकूणच नैसर्गिक संवेदनशीलता या साऱ्याच गोष्टींनी माझ्या मनाला भुरळ पाडली होती… आयुष्याला सर्वार्थाने समर्पक होईल असे खूप काही तिच्यामध्ये आहे असे मनाला पटले होते.

मी त्यावेळी बेरोजगार असल्याने तेजूला प्रपोज करण्याची हिंमत केली नाही. भावना विकसित व्हायला पैसे लागत नाही, पण भावना जगायला मात्र स्वतःच्या कमाईची तजवीज असायला हवी, अशी माझी धारणा होती… तेजूला केवळ प्रपोज करून बघायचे नव्हते, तर तिची कायमची साथ मिळवायची होती… म्हणून आपण करिअरच्या दृष्टीने जरा सोयीला लागल्यावर प्रपोज करू असे मनाने ठरवून टाकले होते. त्यात एक भीती मात्र होती की जर, आपण आत्ता विचारले नाही अन् तोवर… पण मला एक खात्रीसुद्धा होती की, ज्या दिवशी आपली भावना तेजूपर्यंत पोहोचेल तेव्हा ती नक्कीच आपला विचार करेल. त्या खात्रीवरच बरेच दिवस तेजूच्या प्रेमात जगण्याचा आनंद शोधण्यात घालवले.

आमच्या गाढ मैत्रीचे धागे केवळ व्यक्तिगत स्वरूपाचे कधीच नव्हते. तो केवळ दोन जीवांचा स्नेहभावही नव्हता. त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत होत्या. जगाविषयी आणि भोवतालाविषयी सजग असलेल्या दोन व्यक्तित्वाचे ते नाते होते. संस्काराचा कणा, जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यनिष्ठता या सर्व गोष्टींशी आमची अधिक नाळ जुळलेली होती. आम्ही फोनवरच खूप बोलायचो. भेटून बोलण्याला अन् भेटूनच समजून घ्यायलाही वाव नव्हता, मात्र त्याचे आम्हाला यत्किंचितही दुःख नव्हते… आमच्या चर्चा स्वतःचा वैचारिक कस काढणाऱ्या असायच्या. आम्ही एकच किंवा एकसारखा विचार करणारे आहोत, असा समज किंवा गैरसमज कधीही करून घेतला नाही.

मी दिल्लीला नियोजन आयोगाचे सदस्य आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांचा प्रथम स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झालो. सुरुवातीला दिल्लीशी एकरूप झालो. खूप शिकावे वाटले दिल्लीत. या सर्व धांदलीतही तेजूशी नवीन काही वाचन-लेखन यानिमित्ताने गप्पा व्हायच्या… दरम्यानच्या काळात तेजू स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पूर्णवेळ करायला लागली. अभ्यासासाठी मोबाईलचा त्याग तिने काही दिवसांसाठी केला. त्यामुळे आमचा संपर्क काही महिने होऊ शकला नाही… कारण संपर्काचे एकमेव माध्यम होते मोबाईल… काही दिवसांनी तिने पुन्हा मोबाईल वापरणे सुरू केले. मग पुन्हा संपर्क सुरू झाला… आमच्यात वैचारिक गप्पांचे प्रमाण जास्त असायचे… त्यात अनेक विषयांवर मतभेद देखील व्हायचे, पण मनभेद मुळीच होत नव्हते. वाद-विवाद स्वतःचे म्हणणे पटवून देण्यासाठी असायचे; आपले म्हणणे रेटण्याचे काम आम्ही कधीही केले नाही आणि त्यामुळेच विसंवाद कधीही झाला नाही.

माझे काही ना काही निमित्ताने पुण्याला येणे-जाणे व्हायचे… पुण्यातील बाकीच्या कामातून वेळ काढून तेजूची धावती भेट घेतल्याशिवाय पुण्यातून पार निघत नसे आणि तीही तिच्या अभ्यासातून वेळ काढून मला नक्कीच वेळ द्यायची….भेटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. अशाच गप्पांमध्ये मी एकदा मनातला एक प्रश्न सहजच तेजूला विचारला… जर तू युपीएससी क्लीअर नाही केली तर, काय करायचे ठरवलेय? त्यावर तिचे उत्तर नॉर्थ ईस्टमध्ये जाऊन काम करणार आहे. एका एनजीओच्या माध्यमातून… तिच्या उत्तराने मी तर अवाक् झालो. मला तिचे उत्तर ऐकून खूपच आनंद झाला. उत्तर अनपेक्षित नव्हते कारण तेजूला मी कधीच सर्वसामान्य विचार करताना पाहिले किंवा ऐकले नव्हते. मात्र ते उत्तर तिला सर्वार्थाने शोभेल असे होते. त्यामुळेच त्याचा अतिव आनंद झाला होता…

तेजूला आयुष्याची अर्धांगिणी करण्याच्या निर्णयावरचे माझे शिक्कामोर्तब त्या दिवशी अधिक घट्ट झाले. त्याच दिवशी तेजूला प्रपोज करूयात असेही वाटले… पोटातले शब्द ओठात येऊन परत जात होते… पण वेळ खूप कमी होता… काहीतरी कार्यालयीन कामाची धावपळ असल्याने इच्छा नसताना तिथून निघावे लागले. तेजूने माझ्या मनात काय चाललंय हे पहिल्या भेटीपासून ओळखले होते आणि नाही म्हटले तरी मुलींना सिक्स सेंस असतोच ना! तेजूचा तर तो अधिक सजग आहे याचा मी अनुभव घेतलाय.

मला दिल्लीची नोकरी लागल्यापासून माझ्या घरच्यांना मी लग्न करावे असे फार वाटत होते. मी मात्र लग्नाविषयीची चर्चा टाळत तर असे किंवा मग माझी लग्नाबाबतची भूमिका त्यांना सांगत असे… त्या भूमिकेत अनेक गोष्टी होत्या… सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता हुंडा न घेण्याचा. जो माझ्या कुटुंबियांना सहजासजही पेलणारा नव्हता… मला तीन बहिणी व एक भाऊ. त्यांच्या सगळ्यांच्या लग्नात हुंडा दिलेला अन् घेतलेला. त्यामुळे माझ्याबाबतीत त्यांनी मोठ्या लग्नाची आणि मोठ्या हुंड्याची अप्रत्यक्षरीत्या का होईना स्वप्नं पाहिलेली. माझ्यासाठी ज्या मुलींची स्थळ यायची ते लोक पण तसेच ऑफर करायचे…

 

त्या काळात कुटुंबियांना लग्नाबाबत मी काही ठरवले आहे, असे सांगण्यासारखे माझ्याकडेही काही नव्हते… कारण तोवर मी तेजूला विचारले नव्हते आणि मनाने मी तर तिच्याबाबतीत अगदीच ठाम होतो. तेजूचा करिअरचा अगदीच महत्त्वाचा टप्पा असल्याने आपण आता विचारल्याने तेजूच्या अभ्यासावर परिणाम होऊन तिला तिच्या स्वप्नाकडे जाण्यात उगाच प्रश्न निर्माण होईल असे मला वाटत होते. म्हणून मी थांबलो होतो.

तेजूला युपीएससीच्या पहिल्या प्रयत्नाच्या पूर्व परीक्षेत अपयश आले… त्यावेळी मात्र आता आपण विचारूयात असे ठरवून एके दिवशी गप्पांमधून माझ्या घरचे लोक लग्नासाठी माझ्या मागे लागलेत असे तिला सांगत असतानाच नकळतपणे माझ्या अपेक्षा तिच्या कानावर घातल्या. त्या अपेक्षांमध्ये तू बसते आहे… माझा विचार कर. माझी प्रपोज करण्याची स्टाईल तिला खटकली. खरे तर त्यावेळी भेटून आपण सविस्तर भावना व्यक्त करू असे मनात असतानासुद्धा ते अप्रत्यक्षपणेच व्यक्त

झाले. माझ्याकडून गडबड झाली असे मला फार वाटून गेले. कारण मला जे म्हणायचे होते, जे माझ्या मनात जवळपास दोन वर्षांपासून होते ते का नाही व्यक्त झाले. आजही आठवले तर मला स्वतःचा राग येतो कारण माझी जी प्रामाणिक भावना होती, ती पूर्णपणे व्यक्त होऊ शकली नव्हती. त्यातला मतितार्थ एवढाच होता की, माझ्या मनातील अर्धांगिणीची जागा तू काबीज केली आहेस… त्यावर तेजू म्हणाली, सध्या मी या विचारात नाही… आणि तुला उगाच अपेक्षांवर ठेवायला मला आवडणार नाही…

मी तिला आपण बोलत राहू… विचार काही असू दे असे नम्रपणे सांगितले. कारण बोलत राहण्यातच ती माझा विचार करणार असे मला वाटत होते… तिच्या त्या नकारार्थी बोलण्यावरून माझा मीच घेतलेला अर्थ मात्र सकारात्मक होता. माझ्या मनातील भावना तिच्या नकारात होकार मानणारी होती… मी तिला तू वेळ घ्यावास असेही सांगितले… त्यावरही तिने अरे बाबा, तुला वाट पाहायला लावू अन् त्यानंतरही मी जर नाही म्हटले तर तू काय करणार? त्यावरही माझी तयारी अगं चालेल तेजू मला. तुला वेळ देणंही माझ्यासाठी प्रेमात जगल्यासारखंच आहे… असे करून आमची चर्चा थांबली. पुढे तिच्या अभ्यासाचा ओघ वाढला आणि माझ्या मनाची तिच्यातील गुंफण वाढत जात असताना तिने मी तिच्यात अडकून राहण्यात काही अर्थ नाही म्हणून काही दिवसांसाठी न बोलण्याचा निर्णय घेतला…

तिच्या न बोलण्याचा निर्णय मला सहजासहजी पेललाच नाही… त्यावर मी एक सविस्तर मेल पाठवला. त्याला तीन त्यावेळी काहीही प्रतिसाद दिला नाही. मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. पण या सर्व घडामोडींनी माझे तिच्यावरचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढले; त्यातून बाहेर पडण्याऐवजी मी त्यातच गुरफटून गेलो. त्यातून बाहेर पडता येईल असे काही वाटत नव्हते… दरम्यान तिची दुसऱ्या प्रयत्नाची युपीएससीची पूर्वपरीक्षा झाली होती. ती निकालाची वाट पाहत होती. आमच्या अमृता देसरडा या कॉमन मैत्रिणीने तेजूला माझ्याशी बोलण्याची विनंती केली. त्यावर सारासार विचार करून आणि मी तिचा विचार सोडला असेल असे गृहीत धरून माझ्या मेलला (तब्बल सात महिन्यांनी) उत्तर दिले आणि आम्ही पुन्हा पूर्ववत बोलायला लागलो…

पुन्हा बोलण्यात पूर्वीच्या काही काळ न बोलण्याचा राग नव्हता; होती ती उत्सुकता, मधल्या काळात एकमेकांच्या आयुष्यात काय काय घडले हे जाणून घेण्याची. युपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा निकाल लागला. तेजूचा निकाल पॉझिटिव्ह आला… मग तर तिचा जोमाने अभ्यास सुरू झाला. मी ठरवले आपण तेजूची मुख्य परीक्षा पूर्ण होईपर्यत तिला काहीही विषय काढायचा नाही… तेजूची मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये संपली…

आम्ही फोनवर पुन्हा भरभरून बोललो. त्यात कहर म्हणजे माझ्या लग्नाच्या विषयावर मी तिच्याशी चर्चा केली. माझ्या लग्नाबाबतच्या काही मुद्द्यांवर माझ्या घरच्यांना कसे पटवायचे यावरही आम्ही बोललो. त्यावेळी माझी आमच्या लग्नाच्या विषयांवर बोलण्याची हिंमत नाही झाली… दरम्यानच्या काळात माझे पुण्याला जाणे झाले… त्या भेटीत संपूर्ण दिवसभर आम्ही पुन्हा आमच्या एकत्र येण्यावर बोललो… त्याही भेटीत तिचा होकार नाही मिळवता आला.

तेजूचे एका कामाच्या निमित्ताने दिल्लीला येणे झाले; त्यावेळी मात्र आम्ही आमच्या विषयावर काहीही बोललो नाही; मात्र त्यावेळी काहीही न बोलताच त्याच भेटीने तिच्या मनात माझ्याविषयी थोडीशी जागा निर्माण झाली… पुन्हा पुण्याला एक भेट झाली तोवर आमच्यात खूपच चांगली अंडरस्टँडिंग निर्माण झाली होती. त्या पुण्याच्या भेटीचा दिवस होता २६ जानेवारी २०१२. त्या दिवशी आमच्या पहिल्या भेटीला तीन वर्ष पूर्ण झाली होती… वेळ संध्याकाळची. ठिकाण सेनापती बापट रोड. निमित्त कॉफी पिण्याचे… गप्पांचा विषय अनिश्चित मात्र जिव्हाळ्याचा… मागच्या तीन वर्षांवर बोलत बोलत आम्ही मूळ विषयावर आलो… त्याच्या आदल्या दिवशी तेजूची आणि माझी जुजबी भेट झाली होती, त्यावेळी मी तिला माझ्या तिच्याविषयीच्या भावना आणि भूमिकेबाबत फार पूर्वी लिहिलेले प्रदीर्घ पत्र दिले होते. त्या पत्रातील एक गोष्ट तिला फार आवडली होती… ती अशी- तेजू तुला सहज मिळवण्यात काही मजा नाही, तुला संघर्ष करून मिळवण्यात काहीतरी मजा असेल आणि घडलेही तसेच काहीतरी. त्या पत्राप्रमाणे मी जगलो- वागलो होतो. तेच तिला आवडले होते…

माझी कुठलीही कौंटुबिक चौकशी करण्याशिवाय ती निर्णयावर आली होती… त्यावेळी माझा चेहरा अधिक उत्साही झालेला पाहून तिने हळूच आनंदाची मोहर उमटवणारा तिचा निर्णय सांगितला… ती म्हणाली, माझ्या मनाला आणि बुद्धीला पटलेय. तू माझ्या आई-वडिलांना भेटावे आणि त्यांना पटवावे… तू त्यांना विचारशील असे तू अगोदरच म्हणाला आहेस. त्याप्रमाणे तू विचारावंस त्यांना… माझा निर्णय झाला आहे… मला खात्री आहे की तुला यश येईल… काही क्षण मला काहीच कळले नाही… मला स्वप्न तर पडले नाही ना असेच वाटत राहिले. काहीशा वेळाने मी शुद्धीवर आलो… आम्ही एकमेकांचा निरोप घेतला…

१ फेब्रुवारी २०१२ रोजी तेजूने आमच्या निर्णयाचा विषय तिच्या मातोश्रींच्या कानावर घातला. तिच्या आईने लागलीच माझ्याबाबतची साधारण चौकशी केली; अन् निर्णय तुझे वडील घेतील असे सांगून स्वतःचा निर्णय सांगितला… मुलींना वडिलांच्या कानावर कुठलाही विषय घालायचे असेल तर त्यासाठी आई हे उत्तम माध्यम… तेजूच्या वडिलांच्या कानावर विषय आईच्या माध्रमातून गेला… त्यावेळी तेजू एम.पी.एस.सीच्या मुलाखतीची तयारी करत होती. करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असल्याने तिच्या आई, वडिलांनी तिच्याशी या विषयांवर जरा निवांत बोलू असे ठरविले…

दरम्यानच्या काळात तेजूची युपीएससीच्या मुलाखत चाचणीला निवड झाली. तिच्या मुलाखतीला सोबत कुठलीही मैत्रीण नसल्याने तिने आपल्या आईला आणण्याचा निर्णय घेतला… तेजूची आई आणि ती मुलाखतीसाठी दिल्लीत आल्या… मला भेटल्या… माझ्या दिल्लीच्या घरीच त्या थांबल्या. मी स्वतःच्या हाताने मेथीची भाजी, पोळ्या व वरण- भात आणि बटाट्याची पातळ भाजी असे जेवण बनवून ठेवले होते… खूपच छान होते ते दिवस. खूप आनंद वाटायचा हे सर्व करताना… सासूबाईंनी जावयाच्या हातचा स्वयंपाक खाण्याचे योगायोग तसे दुर्मिळच. तेजूच्या आईने माझ्या हातच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेतला आणि खूप कौतुकही केले.

लग्न ठरताना तेजूच्या युपीएससीच्या व्यक्तिमत्त्व चाचणीच्या वेळीच आपली पण व्यक्तिमत्त्व चाचणी होईल, असे मला मुळीच वाटले नव्हते. दिल्लीत तेजूच्या आई मला जाणून घेत असताना तिकडे शेवगावला तिच्या वडिलांपर्यंत खबरबात पोहोचत होती. तेजूच्या मुलाखतीच्या दिवसापर्यंत आम्ही थेट या विषयावर बोललो नाही. १६ एप्रिलला एकीकडे दुपारी १२.३० ला तेजू दिल्लीतील शहाजहान रोडवरील युपीएससीच्या इमारतीत मुलाखतीला गेली अन् दुसरीकडे समोरच्या हिरवळीवर माझ्या मुलाखतीला सुरुवात झाली. मी त्यांना माझ्या सहजीवन आणि एकूणच लग्नाच्या संकल्पना सांगितल्या… घरच्या परिस्थितीवर ओघानेच चर्चा झाली. लग्न आणि सहजीवनाबाबतची माझी स्पष्टता त्यांच्या मनाला पटली होती… त्यांच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी निर्णय घेण्याची शक्यता दिसत होती.

तेजू आणि तिच्या मातोश्री परतीच्या प्रवासाला जात असताना त्यांनी मला तुमचे ५० टक्के काम मी केलेय; बाकी तुम्ही बघा, असे त्या मला सांगून गेल्या होत्या. त्या शेवगावला परतल्या… पुढे सर्व काही वेगाने घडले… तेजूच्या वडिलांनी औपचारिकता म्हणून आमच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तोवर आमच्या घरी मी तेजूबाबत आणि आमच्या लग्नाच्या निर्णयाबाबत मजबूत वातावरण निर्मिती केली होती… माझ्या बहिणीला (माईला) सर्व घडामोडी अगोदरपासून माहीत होत्या. त्यामुळे अडचण येणार नाही याची मला खात्रीच होती… त्यात माझे एकमेव लाडके चुलते ‘नाना’ माझ्या निर्णयाचे कायमच स्वागत करतात. माझ्या घरच्यांनी आनंदाने माझ्या लग्नाच्या निर्णयाचे स्वागत केले. (तसा माझ्या घरच्यांना माझ्या गप्प बसण्याचा अंदाज होताच). तेजूच्या घरच्या मंडळींपैकी तेजूचे वडील, मामा, काका, आणि एक चुलते आमच्या घरी वराचे घर बघण्याचा भाग म्हणून आले… आमच्या घरच्या मंडळींनी त्यांचे उत्तम रीतीने आदरतिथ्थ केले… माझ्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला…

माझ्या दिल्लीतील नोकरीची वस्तुनिष्ठ माहिती माझ्या घरच्यांना माहीत असूनही पाहुण्यांना नेमकेपणाने देता आली नाही… त्यामुळे तेजूच्या मामा, काकांचे कनफ्युजन झाले… माझ्या घरच्यांना मात्र असे वाटून गेले की, पाहुण्यांना सर्व काही पटले असावे… मात्र तेजूच्या घरच्या मंडळींना बघताक्षणी माझ्या घरची परिस्थिती फारशी पटली नव्हती. त्यांना आपण मुलीचे ऐकून गडबड तर करीत नाही ना असे वाटून गेले होते… त्याला कारणीभूत होती माझी घरची परिस्थिती… माझे गावाकडचे घर अगदी छोटेसे आणि साधे असल्याने त्यांची नाराजी झाली होती.

ज्या दिवशी तेजूच्या परिवारातील मंडळींनी माझ्या कुटुंबियांची भेट घेतली, त्याच दिवशी माझ्या परिस्थितीच्या कारणामुळे आमचे लग्न निश्चितीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते… तेजूच्या मामांनी माझ्या करिअर आणि एकूण परिस्थितीवरून काही प्रश्न उपस्थित केले होते. मला तेजूची आई वगळता कुणीही पाहिले नव्हते. तेजूचा त्या सर्वांना आग्रह होता की, तुम्ही अगोदर किशोरला भेटा आणि मग विचार करा. कारण तिला ही खात्री होती की, ते जेव्हा मला भेटतील, माझी तिच्याबाबतची आणि एकूण नात्याबाबतची भूमिका लक्षात घेतील तेव्हा ते नक्कीच सकारात्मक विचार करतील. तेजूच्या वडिलांनी तेजूला विश्वासात घेऊन असे आश्वासन दिले होते की, बाळ तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही… यातच तसा आमच्या लग्नाचा होकार दडला होता…

मात्र लग्नाच्या बाबतीत नातेवाईकांच्या मान्यतेलाही महत्त्व द्यावेच लागते. त्याप्रमाणे मी एकदा तेजूच्या वडिलांना थेट भेटावे असा प्रस्ताव होता. त्यावर तिच्या वडिलांनी तेजूचे मामा आणि ते स्वतः मला भेटतील असे ठरवले. त्यांच्यासोबत माझी फायनल मुलाखत असणार होती… पहिल्यांदा मुलाखत पुण्याला होणार होती, नंतर ती शेवगावला ठरली.

मी दिल्लीहून अवघ्या एका दिवसासाठी दिल्ली-पुणे फ्लाईट्ने पुणे गाठले. तिथून शेवगाव… पाच तास बसचा प्रवास… मनात धूकधूक… अखेर मध्यरात्री शेवगावला पोहोचलो… रात्री झोप घेऊन सकाळी पॅनलला सामोरे जायचे होते… कशीबशी रात्र कटवली… सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने मुलाखतीच्या पॅनलला सामोरे गेलो… पॅनलचे चेअरमन होते तेजूचे मामा… सैन्यातून निवृत्त झालेले आणि व्यवसायात रमलेले… नात्यांच्या वरकरणी समजुतीबरोबर भोवतालचे जग बऱ्यापैकी माहीत असलेले… त्यांच्या आगमनाबरोबरच थोडीशी मनात धडकी भरली… थोडा वेळ असे वाटले की, हा सैन्यदलातील माणूस आहे. सरळ मुलाखत घेतात की अजून काही… मात्र त्यांनी अगदी मी राज्यशास्त्र विषय विशेष विषय म्हणून का घेतला इथपासून सुरुवात केली…

मग हळूवारपणे प्रश्नामधील मुलाखत मी गप्पांवर नेली… प्रश्नाऐवजी चर्चा सुरू झाली… ओघानेच आमच्या सहजीवनावर मी काही विचार केलाय का? असा विषय आला… त्यावर मी सविस्तर मत प्रदर्शित करून सरतेशेवटी एवढेच म्हणालो, तुम्हाला अभिमान वाटेल असेच आमचे सहजीवन असेल. माझ्या नात्यांबाबतच्या स्पष्टतेवरून त्यांच्या प्रश्नांचा ओघ ओसरला… एक प्रश्न मात्र मला आवडलेला आणि आणि अडचणीत आणणारा होता. प्रश्न असा होता- जर आम्ही नकार दिला तर… मी काहीसा दचकलो आणि अगदी सावध होऊन म्हणालो… की मुलगी तुमची, निर्णय तुम्ही घेणार आहात. माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचवली… अर्थात तुम्ही नकार दिला तर मला फारच दुःख होईल आणि यातून बाहेर पडण्याचा मी विचारसुद्धा केलेला नाही. त्यामुळे यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल माहीत नाही. त्यांना माझी संस्काराची बाजू तपासायची होती… मामांचा सूर मात्र माझ्या लक्षात आला होता… त्यांच्या चेहऱ्यावरून मला असे जाणवत होते की ते माझ्या निवेदनावर समाधानी आहेत. त्यामुळे मी खूशीत तर होतोच, जोडीला माझा आत्मविश्वासही वाढला होता. जीवनाच्या मुख्य ध्येयापासून सहजीवनाच्या गुंत्यांपर्यंत झालेल्या गप्पांनी आमची जुनीच ओळख असल्यासारखे मला वाटत होते… मग आम्ही समाजकारण, राजकारण, स्त्रीवाद यासारख्या असंख्य विषयांवर मनमुराद गप्पा झाल्या… त्यांनी औपचारिकपणे तेजूशी चर्चा केली होती…

माझ्या तुलनेत तेजूचा स्वभाव आक्रमक… म्हणून तिच्या मामांनी तिला म्हटले की, किशोर तर फार शांत स्वभावाचा वाटतो हे कसं जमायचं… आम्ही तर तुझ्यासाठी आक्रमक मुलगा बघणार होतो. त्यावर तेजूने जे उत्तर दिले ते फार मार्मिक होते. ती म्हणाली, मामा मी आक्रमक आहे ; पप्पांचा स्वभाव शांत आहे, पण माझा राग किंवा आक्रमकता फक्त पप्पाच नियंत्रणात आणू शकतात. कारण ते माझा आक्रमकपणा शांतपणे हाताळतात आणि मला किशोरच्या बाबतीतही तेच वाटते. तसेच मला पप्पा आणि किशोर यांच्यात कुठेतरी साम्य दिसतेय. दोघेही आक्रमक असले तर कसे जमायचे? कुणीतरी एक नमते घेणारे पाहिजे ना हो मामा! मामा निशब्द झाले… मामांना असेही वाटून गेले असावे की, नव्या पिढीला नाती जगण्याची समज आपल्यापेक्षा अधिक आली आहे.

जेवणाचा कार्यक्रम उरकला… आणि माझ्या निरोपाची तयारी सुरू झाली. तेजूच्या आईंनी तेजूला सहजच विचारले, ताई (तेजू) काय करायचं? टोपी उपरणे घालायचे का? तेजूने तिच्या कुटुंबियांना विनंती केली की, तुम्ही टोपी उपरणे घाला नाही, तर नका घालू, पण तुमचा जो काही निर्णय आहे,  त्याला कळवा म्हणजे तो खूश होईल… मग माझ्या निरोपाची सभा भरली… मला सकारात्मक निकाल अपेक्षित होता… आणि त्याची खात्री देखील होती. अगदी आनंदाने दलदलून गेलो होतो… कधी निर्णयाची घोषणा होते त्याची मी वाट पाहत होतो…

तेजूच्या वडिलांनी छोटेखानी निवेदन केले. आवश्यक तेवढे अन् मार्मिक बोलण्यात त्यांना तोडच नाही. ते म्हणाले, तुम्ही सकाळी बोलताना म्हणालात की, तुम्हाला अभिमान वाटेल असेच आमचे सहजीवन असेल, मग आमची तेवढीच अपेक्षा आहे. माझ्या आनंदाला थाराच उरला नाही… काही क्षण डोळे झाकून मी स्वतःशी बोललो… पुन्हा चर्चेत सहभागी झालो… त्या दिवसभराच्या चर्चेत तेजूचे वडील एक शब्दही बोलले नव्हते… त्यांनी फक्त निर्णय जाहीर केला. तेव्हा मला कळले की, हा समारंभ आप्तस्वकियांच्या मानमरातबासाठी होता… त्यांच्या निर्णयाने मी चिकार खूश होऊन शेवगावहून पुण्याकडे आगेकूच केले… सदा सर्वदा माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्यांना सर्वांनाच मी ही गोड बातमी दिली… अन् पुन्हा दिल्लीला परतलो…

मेच्या पहिल्या आठवड्यात तेजूचा युपीएससीचा निकाल लागला… देशात १९८ आणि राज्यात सहावा क्रमांक… सगळीकडे आनंदी आनंद… माझ्या घरच्या मंडळींना माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचे जास्त कौतुक वाटले… स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याने तेजू साधारण तीन ते चार महिन्यासाठीच फ्री असल्याने आमचे लग्न लवकरच करण्याचा निर्णय झाला… लग्नाच्या परंपरा आणि संस्कृतीवरून खूप खलबते झाली… माझ्या कुटुंबियांनी हुंडा न घेणे मान्य केले होते. मग तथाकथित मान-पानही आम्ही नाकारला… लग्नात मुलीकडच्या मंडळीनी मुलगी सासरी जाताना गरजेच्या वस्तू देण्याचा रिवाज आहे तो ही आम्ही नाकारला. मी तर असेही कळवले होते की, जरी चुकून तुम्ही लग्नात काहीही मांडलेले दिसले तरी ते आम्ही घेऊन जाणार नाही. लग्नाच्या पारंपरिक रीतीरिवाजांना आम्ही आमच्या परीने फाटा देऊ शकलो.

मोजक्या लोकांत लग्न व्हावे असे आम्हाला मनोमन वाटत होते. ते ही आमच्या मनाप्रमाणे झाले. आमच्या म्हणण्याला १०० टक्के मान्यता मिळाली नाही, मात्र जी मिळाली ती ही आमच्या कुटुंबियांच्या एकूण सार्वत्रिक पार्श्वभूमीचा विचार करता कौतुकास पात्रच आहे… उर्वरित गोष्टी भविष्यात आमच्या कुटुंबातील इतरांच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही पार पाडू शकू असे आम्हाला वाटते.

आमच्यात समान धागे अनेक… पण जितके समान तितकाच वेगळेपणा देखील आहे… समान गोष्टींचा आनंद घेणे आणि इतर वेगळेपणाचा आदर करणे. आम्ही दोघेही कळत न कळत एकमेकांच्या करिअरविषयी अधिक सजग आहोत. स्टेटसचा विचार सहजीवनात आणायचा नाही हे आम्हाला ठरवावेदेखील लागले नाही. कारण आम्ही एकमेकांसाठी जगणारे केवळ दोन व्यक्ती आहोत. बाकी सर्व काही निमित्तमात्र आहे. आज ती मोठ्या पदावर आहे. कदाचित उद्या मी मोठ्या पदावर असेन, मात्र नाते फक्त जीवांचे असेल, पदाचे नाही. पद हा मोठेपणा नाही… मिळालेल्या संधीला न्याय देण्यात धन्यता मानायचा… तोच खरा आनंद.

……………………………………………………………………………………………………………………………

लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

[email protected]

साभार अक्षरनामा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: तेजस्वी सातपुतेपोलीस अधीक्षकमहिला दिनसोलापूर
ADVERTISEMENT
Next Post
सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा आघाडी सरकारला सल्ला

संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, कुणाची करणार पोलखोल ?

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group