केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द काढल्याने महाराष्ट्रात वातावरण पेटलेलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा सह्दला आहे. महाराष्ट्रात अशी भाषा कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले?, असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
तसेच जयंत पाटील यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे. नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागायचं काम केलंय. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असं पाटील म्हणाले आहेत.
राणेंच्या वक्तव्याने केवळ शिवसैनिकच नाही तर राज्यातील जनताही दुखावली गेली आहे. हा आपण निवडलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे, अशी भावना लोकांची झाली आहे. जेव्हा मुद्दे संपतात, तेव्हा लोक गुद्द्यावर येतात. भाजपचे मुद्दे आता संपले आहेत, यातून आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्यावेळी मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक मतपेटीतून भाजपच्या विरोधात रोष दाखविल्याशिवाय राहणार नाही असे पाटील यांनी यावेळी बोलून दाखविले होते.