माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला हजर राहणार की गैरहजर राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत सूचक विधान केलं. आज माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करुन घेतलंय. प्रकृतीच्या कारणास्तव ते येण्याची शक्यता कमी असल्याचं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय. त्यामुळे आजच्या विशेष अधिवेशनाला अजित पवार उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होतोय. भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेच्या राजन साळवी यांच्यात लढत होतेय. यासाठी आता एक एक मत महत्त्वाचं असल्यामुळे अजित पवार हे अधिवेशनाला येतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.