पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या प्राध्यापक पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यास समोर आला आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेहे वनखात्यात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. हत्येनंतर आरोपी पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा मृतदेह दूरवर फेकून दिला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
यवतमाळमधील उमरखेड येथे राहत असलेले प्रा. सचिन देशमुख आपल्या पत्नी धनश्रीला भेटण्यासाठी अकोल्यातील अकोट येथे आले होते. धनश्री येथेच वनरक्षक म्हणून कार्यरत होती. सचिन आणि धनश्री ज्याठिकाणी भेटले होते तेथेच काही वेळाने तिथे तिचा प्रियकर वनरक्षक शिवम पोहोचला. मात्र येथे सचिन आणि शिवमध्ये जोरदार भांडण झालं. यावेळी शिवमने सचिनचा गळा दाबल्याने तो बेशुद्ध पडला. यानंतर कारमध्ये बसवून शिवमने सचिनचा ओढणीने गळा आवळून खून केला.
कुणालाही संशय येऊ नये म्हणून दोघांनीही सचिनचा मृतदेह यवतमाळ येथील दिग्रस येथे नेऊन फेकला. यानंतर दुसऱ्या दिवशी धनश्रीने सासरी फोन करुन सचिन घरी पोहोचला का अशी विचारणा केली. मात्र सचिनचा काही पत्ता लागत नसल्याने घरच्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरु केला.
त्याच दिवशी सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस चौकशीत सगळा प्रकार उघडकीस आला. धनश्री आणि सचिनचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर शेवटच्या क्षणी दोघेही एकत्र असल्याचं समोर आलं आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.