भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद आता आणखी चिघळला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं. उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता.
अशा परिस्थितीत उर्फी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत पुन्हा वक्तव्य केले आहे. “एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सावित्रीबाई फुले यांचं नाव घ्यायचं आणि या महाराष्ट्रात आपण उर्फी जावेदचा नंगानाच कसा सहन करतो? आत्ताच्या आमच्या भगिनी स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. या सावित्रीच्या लेकींना उर्फीचा नंगा नाच मान्य आहे का?” असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
“सार्वजनिक ठिकाणी आम्हाला नंगा नाच मुळीच मान्य नाही. स्वातंत्र्याच्या नावावर सुरू असलेला स्वैराचार आम्ही खपवून घेणार नाही. माझं भांडण हे त्या बाईशी नाही. तिच्या विकृतीशी आहे. हे मी पहिल्या दिवसापासून सांगते आहे. मी जो काही विषय हाती घेतला आहे तो समाज स्वास्थ्याचा विषय आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. चार भिंतीच्या आत तुम्हाला काय करायचं ते करा. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर तुम्ही नंगा नाच घालणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही आम्ही ते चालू देणार नाही”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.