मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भारतीय जनता पक्षाच्या नेल्या चित्रा वाघ यांच्यात वाद होत असल्याच चित्रं संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येत आहे. मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर उर्फी जावेदही सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देत सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यातच आता उर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांतही उर्फीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, उर्फी जावेदवर महिला आयोग का कारवाई करत नाही? असा सवाल करत रुपाली चाकणकरांना चित्रा वाघ यांनी लक्ष्य केले. त्यामुळे उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याचप्रकरणी उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, उर्फी जावेद समोर आली तर तिचे थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिने नंगानाच सुरु ठेवला तर तिचे थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.