मुंबई शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मागच्या काही दिवसांपासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे बदनामी करत असून बिनबुडाचे आरोप ते सरनाईक कुटुंबियांवर लगावत आहेत. यामुळे आता प्रताप सरनाईक चांगलेच भडकले आहेत.
किरीट सोमय्यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र, यातलं काहीच झालं नसल्यामुळे आता प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली आहे. मात्र सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेमुळे त्रस्त झालेल्या प्रताप सरनाईक यांनी आता किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
‘१०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे’, अशी टीका किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केली होती.