अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ होतोय व्हायरल 

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ होतोय व्हायरल

 

वॉशिंग्टनः भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (kamala harris) यांनी अमेरिकेच्या (USA) उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकून अनेक विक्रम नोंदवले आहेत. अमेरिकन इतिहासात त्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती (Vice president) आहेत आणि त्याव्यतिरिक्त त्या पहिल्या आशियाई अमेरिकन उपराष्ट्रपतीही असतील. हॉवर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कमला हॅरिस या २०१० मध्ये कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल बनल्या होत्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी ट्विट केले की, ‘ही निवडणूक माझ्यासाठी आणि जो बायडेन (joe biden) यांच्यासाठी खूप महत्वाची होती. हे अमेरिकेच्या आत्म्याविषयी आणि लढा देण्याच्या आमच्या इच्छेविषयी होते. आम्हाला पुढे बरेच काम करायचे आहे. चला आपण त्याला सुरुवात करूया.’ या सर्वांच्या दरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये कमला हॅरिस निवडणूक जिंकल्यानंतर जो बिडेन यांचे अभिनंदन करत आहे. ही क्लिप ट्विटरवर व्हायरल होत आहे. हॅरिस एका पार्कमध्ये दिसत आहेत आणि त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना फोनवरुन डेमोक्रॅट्सच्या विजयाबद्दल हसत-हसत आणि अभिनंदन करत आहेत. त्या फोनवर म्हणतात की, ‘आपण करुन दाखवलं. आपण करुन दाखवलं, जो. तुम्ही अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार आहात.’

भारतीय वंशाच्या आई आणि जमैकाचे वडील

कमला हॅरिस यांची आई भारतीय वंशाची असून वडील जमैकन वंशाचे आहेत. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आईनेच कमला हॅरिस यांना सांभाळलं.  कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रॅट नेत्या कमला हॅरिस यांची आई कर्करोग संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. कमला हॅरिस या आपल्या आईसमवेत अनेकदा भारतात येत होत्या, परंतु हॅरिस यांनी असंही म्हटलं होतं की, तिच्या आईने अमेरिकन-आफ्रिकन संस्कृती स्वीकारली होती.

 

कुटुंबीयांमध्ये मोठा आनंदोत्सव

कमला हॅरिस यांच्या या यशाने त्यांचे मामा गोपालन बालाचंद्रन यांना सुखद धक्का बसला आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, त्यांनी एक दिवस आधीच आपल्या भाचीला सांगितलं होतं की, ती जिंकणार आहे आणि अमेरिकेची पुढील उपाध्यक्ष होईल. हॅरिस यांचे योद्धा म्हणून वर्णन करताना बालचंद्रन म्हणाले की, त्यांना खूप ‘आनंद आणि अभिमान आहे’. ते म्हणाले की, बायडेन-हॅरिस यांचा विजय आम्हाला पाहायचा होता.’ दरम्यान, कमला हॅरिस यांच्या विजयानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: