उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख ! अनोख्या पद्धतीने केले अभिनंदन

मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या विजयावर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: