शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊतांच्या यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांना टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं असं राऊतांना वाटत असेल तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्की मोठा राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठा नाही, असं राऊतांना वाटतं असा टोला फडणवीसांनी राऊतांच्या विधानावर लगावला होता.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांना जी संधी मिळाली आहे त्या संधीचं मुख्यमंत्र्यांनी सोनं करावं, असं देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.