मुंबई | ट्विटर साईटवरती भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताच्या नकाशातील जम्मू-काश्मीर व लडाख हे प्रदेश वेगळे देश दाखवल्याने नव्य वादाला तोंड फुटले होते. तसेच भारताचा दाखवण्यात आलेल्या चुकीच्या नकाशामुळे ट्विटरवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली होती.
या प्रकरणात ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक माहेश्वरी यांना दोषी धरून बुलंदशहरच्या बजरंग दलाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, भारतीय IT कायदा २००८ कलम ५०२ (२) व कलम ७४ नुसार देशाचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर व लडाख हे भारताचे अविभाज्य राज्य असून त्यांना वेगळे दाखवून ट्विटरला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटरविरोधात अनेक टीका झाल्यानंतर ट्विटरने चुकीचा नकाशा आपल्या साइटवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.