देशात कोरोनाची तिसरी लाट येईल, आपण तयार राहायला पाहिजे – मुख्य वैज्ञानिक सल्लागार

कोरोनाची तिसरी लाट अटळ पण आपण तयार राहायला पाहिजे – मुख्य वैज्ञानिक सल्लागार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात प्रकोप सुरु असतानाच केंद्र सरकारने आता तिसऱ्या लाटेचीही तयारी सुरु केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाटही येईल. मात्र ही लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. मात्र त्या दृष्टीने तयारी सुरु करण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन (K VijayRaghavan, Principal Scientific Advisor to Centre) यांनी म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

के. विजय राघवन यांनी कोरोना परिस्थितीबाबत बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आधीच्या स्ट्रेनप्रमाणेच पसरत असल्याचे म्हटले. तसेच कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनविरुद्ध देखील लस प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले.

देश-विदेशातून विषाणूचे नवनवीन स्ट्रेन येत राहतील. कोरोनाची एक लाट कमी झाल्यानंतर सावधगिरी न बाळगल्यास दुसरी लाट पसरण्याचा धोका असतो. हे पाहता कोरोनाची तिसरी लाट देखील येईल. परंतु ती नक्की येईल हे सांगणे अवघड आहे. नवीन लाट येणार हे गृहित धरून आपल्याला तयारी करायला हवी, असेही के विजय राघवन म्हणाले.

लसीकरणाने व्हायरस म्युटेट होईल?

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचं हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने देशात लसीकरणावर भर दिला जातोय.

के विजयराघवन पुढे म्हणाले, “रोगप्रतिकारशक्ती किंवा लशीमुळे व्हायरसवर दवाब निर्माण होईल. यातून तो निसटण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण तयारी केली पाहिजे. सद्यस्थितीत लशीचा व्हायरसविरोधात चांगला प्रभाव दिसून येतोय. पण येणाऱ्या काळात व्हायरस बदलल्याने लशीत बदल गरजेचे आहेत.”

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशभरात पाच म्युटंट आढळून आले आहेत. त्यात एक डबल म्युटंटही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने याचा प्रसार तीव्र वेगाने होत आहे. याची संसर्ग क्षमताही खूप जास्त आहे.

डॉ. विजयराघवन पुढे सांगतात, “रोगप्रतिकारकशक्ती वाढली की व्हायरसला पळण्यासाठी जागा मिळत नाही. मग व्हायरस नवीन रस्ते शोधून काढतो. त्यामुळे त्याची संसर्ग क्षमता जास्त असते.”

“लसीकरण वाढलं तर नवीन प्रकारचे एस्केप तयार होतील. आपल्याला त्यासाठी तयार रहावं लागेल,” असंही ते पुढे म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल का जास्त?

महाराष्ट्र कोव्हिड-19 टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात, “तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आलाय.”

“तिसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे.”

तज्ज्ञांच्या मते, किती लोकांचं लसीकरण होईल. त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे अवलंबून असेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यू कमी होण्यास मदत होईल

12 राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण
दरम्यान, काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसतआहे. मात्र आजही देशातील 12 राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तसेच 10 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांहून अधिक असून येथे अजून काम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. तसेच अनेक राज्यांमध्ये मृतांची टक्केवारी वाढली असल्याचेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: