पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस !

सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम सुद्धा युद्ध पातळीवर देशभरात राबवली जात आहे. त्यातच रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जाऊ लागला आहे. या प्रश्नाला आता पूर्णविराम लागला असून पुढील आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्यांनी दिली आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप दाखल झाली असून दुसरी खेप आज भारतात दाखल होणार आहे. या संदर्भात बोलताना पॉल म्हणाले की, “भारतात स्पुटनिक व्ही लस आली आहे. त्याचबरोबर मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, ही लस भारतात पुढच्या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लसीची लवकरच विक्री सुरु होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितले आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवडयामध्ये भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप आली होती. आता लशीची दुसरी खेप लवकरच भारतात दाखल होणार आहे. भारतात रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

या लसीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी मागितली होती. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी ही लस तयार केली असून लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

Team Global News Marathi: